आतापर्यंतचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा प्रवास अडखळतच झालेला पाहायला मिळाला आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये त्यांना तीन सामने गमवावे लागले आहेत. त्यामुळे विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक असून त्यांना बुधवारी घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करावा लागणार आहे.
आतापर्यंत वानखेडेवर झालेल्या दोन सामन्यांपैकी एकही सामना मुंबईला जिंकता आलेला नाही. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि बंगळुरू यांच्यामध्ये निकराची झुंज पाहायला मिळाली आहे. आतापर्यंतच्या १७ सामन्यांपैकी मुंबईने नऊ सामने जिंकले आहेत, तर आठ सामन्यांमध्ये बंगळुरूने विजय मिळवला आहे. गेल्या हंगामातही दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्यामुळे बुधवारच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याची साऱ्यांनाच उत्सुकता असेल.
बंगळुरूने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये एक सामना जिंकला असून दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. फलंदाजी हे बंगळुरूचे मुख्य अस्त्र आहे. कर्णधार विराट कोहली, ए बी डी’व्हिलियर्स हे चांगल्या फॉर्मात आहेत. पण धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला अजूनही सूर गवसललेा नाही. अष्टपैलू शेन वॉटसन आपली जबाबदारी चोख बजावताना दिसत आहे. पण त्यांच्या अन्य फलंदाजांना अजूनही संधी मिळालेली नाही. गोलंदाजी हा संघाचा कमकुवत दुवा आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या मोसमात खेळू शकणार नाही, तर वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सॅम्युअल बद्री जायबंदी असल्यामुळे खेळू शकत नाही. त्यामुळे बंगळुरूची गोलंदाजी दुबळी वाटत आहे. दिल्लीच्या क्विंटन डी’कॉकने गेल्या सामन्यात ते दाखवूनही दिले आहे. त्यामुळे गोलंदाजीवर अधिक मेहनत घेतल्यास बंगळुरूच्या संघाला विजय मिळवणे अवघड नसेल.
मुंबईचा संघ हा सर्वात बेभरवशाचा आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू असले तरी त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही. किरॉन पोलार्ड, जोस बटलर, रोहित शर्मा या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी साकारली असली तरी त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्याचा अभाव जाणवतो.

संघ
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), मार्टिन गप्तील, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू, हार्दिक पंडय़ा, हरभजन सिंग, कोरे अ‍ॅण्डरसन, मिचेल मॅक्लेघन, जोस बटलर, उन्मुक्त चंद, र्मचट डी लँग, सिद्धेश लाड, जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, टीम साऊथी, जगदीश सुचित, आर. विनय कुमार, कृणाल पंडय़ा, नथू सिंग, अक्षय वाखरे, नितीश राणा, जितेश शर्मा, किशोर कामत आणि दीपक पुनिया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ए बी डि’व्हिलियर्स, डेव्हिड विस, अ‍ॅडम मिल्ने, ख्रिस गेल, स्टुअर्ट बिन्नी, केन रिचर्डसन, सॅम्युअल बद्री, ट्रेव्हिस हेड, प्रवीण दुबे, विक्रमजित मलिक, इक्बाल अब्दुल्ला, सचिन बेबी, अक्षय कर्णेवार, विकास टोकस, के. एल. राहुल, परवेझ रसूल, अबु नचिम, हर्षल पटेल, केदार जाधव, मनदीप सिंग, सर्फराझ खान, एस. अरविंद, वरुण आरोन, युझवेंद्र चहल.
वेळ : रात्री ८.००
प्रक्षेपण : सोनी सिक्स,सेट मॅक्स