आयपीएल २०२१च्या स्थगितीनंतर मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंटने काही गोष्टी उघडकीस आणल्या आहेत. पेमेंट नुकताच न्यूझीलंडला परतला आहे. आयपीएलच्या बायो बबलमध्ये करोनाची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर बीसीसीआयने ही लीग अनिश्चित काळासाठी तहकूब केली.

एका मुलाखतीत पेमेंटने उघड केले, की काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना काही सांगणे किंवा काही प्रकारचे निर्बंध लादणे आवडत नाही. आयपीएल २०२१ दरम्यान संघाला सुरक्षित वाटत असल्याचेही त्याने नमूद केले. मुंबईने आपले पहिले पाच सामने चेन्नई आणि त्यानंतर नवी दिल्ली येथे खेळले. त्यानंतर स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.

ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, जेम्स नीशम आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांच्यासमवेत पेमेंट ऑकलंडला गेला. “काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना बंदी किंवा त्यांना काही बोललेले आवडत नाही. पण आम्हाला तिथे सुरक्षित वाटले. आम्हाला पूर्वी माहित होते की जर बबलमध्ये काहीतरी चूक झाली तर प्रवास करणे सर्वात मोठे आव्हान असेल”, असे पेमेंटने सांगितले.

पेमेंट पुढे म्हणाला, की काही भारतीय खेळाडूंचे कुटुंबीय आजारी होते, परंतु असे असूनही, खेळाडूंनी उत्साह वाढविला आणि खेळतच राहिले. भारतीयांनी भारतीयांसाठी चालवल्या जाणाऱ्या लीगचा भाग होण्याचे भाग्य असल्याचेही ते म्हणाले.

मागील वर्षी जेतेपद पटकावलेल्या मुंबईने यंदाच्या हंगामातील पहिला सामना गमावला. पहिल्या सामन्यात त्यांचा आरसीबीकडून पराभव झाला. यानंतर मुंबईने केकेआर आणि सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. पण त्यानंतर त्याचा दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सने त्यांचा पराभव केला. स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी मुंबईने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.