* मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर
* मोसमातील पहिल्याच सामन्यात आदित्य तरेचे अर्धशतक
वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर ओळीने आठ सामने जिंकण्याचा करिष्मा दाखवत मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही शानदार विजयाची नोंद केली. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील अव्वल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद यांसारख्या दिग्गज संघांना हरविल्यानंतर बुधवारी मुंबईने बलाढय़ राजस्थानलाही १४ धावांनी सहजगत्या नामोहरम केले. या विजयानिशी १५ सामन्यांपैकी ११ विजयांसह २२ गुणांनिशी मुंबईने आयपीएलच्या बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच संधी मिळालेला आदित्य तरे हा मुंबई इंडियन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
मुंबईचे आव्हान कठीण मुळीच नव्हते, परंतु धावांचा पाठलाग करणे हे कोणत्याही संघासाठी अवघड असते. कप्तान राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे यांना अल्पावधीत मुंबईच्या गोलंदाजांनी तंबूची वाट दाखवल्यानंतर राजस्थानची फलंदाजीची ताकद बोथट झाली. शेन वॉटसनने (१९) प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा नव्हता. मिचेल जॉन्सन आणि धवल कुलकर्णी या गोलंदाजांनी फक्त ५८ धावांतच राजस्थानचा निम्मा संघ गारद करीत सामन्यावरील पकड घट्ट केली. उत्तरार्धात स्टुअर्ट बिन्नी आणि ब्रॅड हॉग यांनी सातव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचून पराभव टाळण्याचे शर्थीने प्रयत्न केले.
त्याआधी, आदित्य तरेने साकारलेल्या दमदार अर्धशतकामुळे मुंबई इंडियन्सने २० षटकांत ८ बाद १६६ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. दुखापतग्रस्त सचिन तेंडुलकर आणि डच्चू देण्यात आलेल्या ड्वेन स्मिथ यांच्याऐवजी ग्लेन मॅक्सवेल आणि मुंबईच्या आदित्य तरेकडे सलामीची धुरा सोपविण्यात आली. या हंगामात पहिलाच सामना खेळणारा तरे  राजस्थानच्या गोलंदाजांसमोर डगमगला नाही. त्याने ३७ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ५९ धावा काढल्या.
मॅक्सवेलने प्रारंभीपासून आक्रमणाचे हत्त्यार उगारले, पण धावा काढण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर आदित्य तरेने फॉर्मात असलेल्या दिनेश कार्तिकसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूंत ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पण मुंबईच्या धावफलकावर शतक झळकले असताना प्रवीण तांबेने कार्तिकचा अडसर दूर केल्याने मुंबईच्या डावाला स्थर्य लाभले नाही. धावांचा वेग वाढविण्यासाठी एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे मुंबईला पावणेदोनशे धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १६६ (आदित्य तरे ५९, ग्लेन मॅक्सवेल २३, शेन वॉटसन २/३०) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स :२० षटकांत ७ बाद १५२ (ब्रॅड हॉज ३९, स्टुअर्ट बिन्नी नाबाद ३७, धवल कुलकर्णी २/२१).

वानखेडेवरून..
सचिनशिवाय सुनी मैफल!
वानखेडे स्टेडियमची आयपीएलची मैफल मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशिवाय सुनी सुनी वाटत होती. दुखापतीच्या कारणास्तव सचिनने वानखेडेवरील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यातून माघार घेतली. आयपीएलच्या सहाव्या हंगामात तो प्रथमच एखाद्या सामन्याला मुकला. त्यामुळे मुंबई इंडियन्सची १० क्रमांकाची टी-शर्ट्स परिधान करून स्टेडियममध्ये आलेल्या क्रिकेटरसिकांची निराशा झाली. यंदाच्या हंगामात सचिन १४ सामने खेळला आहे. यात एका अर्धशतकाच्या साहाय्याने २२.०७च्या सरासरीने त्याने २८७ धावा केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात षटकार खेचताना त्याच्या मनगटाला दुखापत झाली. त्यानंतर बॅट पकडणे कठीण जात असल्याचे लक्षात आल्यानंतर सचिनने मैदान सोडले होते.
सलामीचे नवे समीकरण जुळले!
मुंबई इंडियन्सचा मूळ संघनायक रिकी पॉन्टिंग या हंगामातील पहिले सहा सामने खेळल्यानंतर पुढील नऊ सामने संधीच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ यांच्या सलामीमध्ये सातत्याचा अभाव आढळत होता. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सचिन दुखापतीमुळे खेळू शकला नाही, तर स्मिथला वगळण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दहा लाख डॉलर्सचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि मुंबईकर आदित्य तरे यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली. या जोडीने २५ धावांची सलामी दिली. यात मॅक्सवेलचा वाटा होता २३ धावांचा. मॅक्सवेलने तीन षटकारांची बरसात करीत आक्रमक २३ धावा केल्या, तर तरेने हंगामातील पहिल्या सामन्यातही आत्मविश्वासाने खेळून ५९ धावा काढल्या.
 
वानखेडेवर लढले सहा मुंबईकर!
वानखेडे स्टेडियमवर घरच्या मैदानाचा फायदा घेता यावा, यासाठी दोन्ही संघांतून सहा जणांना या सामन्यात संधी मिळाली. मुंबई इंडियन्सने प्रमाण मात्र बदलले नाही. कप्तान रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी यांच्याशिवाय फक्त आदित्य तरे हा नवा चेहरा होता. सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत त्याच्या जागी तरेला संघात स्थान मिळाले. परंतु राजस्थानने मात्र तिघांना संधी दिली. सलामीवीर अिजक्य रहाणेचे स्थान राजस्थानच्या संघात निश्चित असते. पण बुधवारी फिरकी गोलंदाज अंकित चव्हाण आणि ४१ वर्षीय प्रवीण तांबे असे आणखी दोन मुंबईचे चेहरे राजस्थानच्या संघातून खेळले.
 
अलविदा मुंबई!
आयपीएलच्या सहाव्या मोसमात वानखेडे स्टेडियमवर मुंबईकरांनी आठ सामने अनुभवले. एप्रिल-मे महिन्यांत हा क्रिकेटज्वर नसानसात भिनल्याचे चित्र वानखेडेवर दिसले. त्यामुळे या आठही सामन्यांना हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धचा वानखेडेवरील अखेरचा साखळी सामना मुंबईकरांच्या साक्षीने झाला. या सामन्यानिशी मुंबईकरांनी आयपीएलचा दु:खद अंत:करणाने निरोप घेतला. या निरोपाच्या सामन्यासाठी ढगसुद्धा दाटले होते. त्यामुळे पावसाची शक्यता वाटत होती. परंतु प्रत्यक्षात पावसाने वगरे ‘खो’ न घातल्यामुळे हा सामना सहज पार पडला.
-के. प्रशांत

स्टिफन फ्लेिमग, चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक
धोनी हा एक चांगला ‘मॅचविनर’ आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. आम्ही बाद फेरीत पोहोचलो असलो तरी बंगळुरूविरुद्धचा अखेरचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून साखळी फेरीचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.