IPL 2021: अर्जुन तेंडुलकरने नुकतीच आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली असली तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने तो नेहमीच चर्चेत असतो. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने सर्वांचीच नजर अर्जुन तेंडुलकरवर आहे. पण अर्जुन वडिलांप्रमाणे फलंदाज नसून वेगवान गोलंदाज असून स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरचं नाव आयपीएलच्या लिलावात आलं तेव्हाच मुंबई इंडियन्स त्याच्यावर बोली लावणार असा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे मुंबई इंडियन्सले २० लाखांच्या मूळ किंमतीत अर्जुन तेंडुलकरला संघात घेतलं आहे.

अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने संघात घेण्यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून काहीजणांनी नेपोटिझमचा उल्लेख केला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धेनेकडून अर्जुन तेंडुलकरला विकत घेण्यामागील कारण सांगण्यात आलं आहे. अर्जुन तेंडुलकरला फक्त आणि फक्त त्याच्या गुणवत्तेच्या आधारे विकत घेतलं असल्याचं त्याने म्हटलं आहे. ESPNcricinfo दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

आणखी वाचा- अर्जुन तेंडुलकरला मुंबईने विकत घेणं ही घराणेशाही नाही का?; IPL लिलावानंतर अनेकांना आठवला प्रणव धनावडे

मुंबई इंडियन्ससोबत खेळणं अर्जुनसाठी एक शिकण्याची प्रक्रिया असेल असा विश्वास महेला जयवर्धेनेने व्यक्त केला आहे. २१ वर्षीय अर्जुनला शिकण्याची आणि आपल्या वेळेसोबत खेळ सुधारण्याची संधी असल्याचंही त्याने सांगितंल आहे.

“आम्ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे निवड केली आहे. सचिनमुळे त्याच्यावर खूप दबाव असणार आहे. पण सुदैवाने तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. त्यामुळे आपण अर्जुनसारखी गोलंदाजी करु शकलो तर सचिनलाही अभिमान वाटेल,” असं महेला जयवर्धेनेने म्हटलं आहे.

आणखी वाचा- अर्जुनला मुंबईनं का घेतलं विकत? माजी खेळाडूनं सांगितलं कारण

“अर्जुनला वेळ देण्याची तसंच जास्त दबाव येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. फक्त त्याला खेळ सुधारु दे आणि काय आपला मार्ग निवडू दे…आम्ही त्याच्या मदतीसाठी आहोतच,” असंही त्याने सांगितलं. अर्जून आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेटमध्ये गोलंदाजी करायचा. गुरुवारी आयपीएल लिलावात खरेदी करण्यात आलेला तो शेवटचा खेळाडू होता.