‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी अवस्था झालेल्या पुणे वॉरियर्सविरुद्ध सचिन तेंडुलकरचा मुंबई इंडियन्स संघ शनिवारी आयपीएल क्रिकेट सामन्यात किती मोठय़ा फरकाने जिंकतो, हीच उत्सुकता निर्माण झाली आहे. कोलकाताविरुद्ध गुरुवारी लाजिरवाणा पराभव स्वीकारणारा पुण्याचा कर्णधार आरोन फिन्च व माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज यांनी सामना संपल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया संघाच्या निराशाजनक कामगिरीचेच प्रतीक आहे. ते म्हणाले, ‘‘पराभवाची कारणे सांगून आता कंटाळा आला आहे.’’
 कर्णधार आरोन फिन्च, युवराज सिंग, अँजेलो मॅथ्यूज, मिचेल मार्श, अजंठा मेंडिस, भुवनेश्वर कुमार, ल्यूक राइट, रॉबिन उथप्पा, अशोक िदडा, वेन पार्नेल, अभिषेक नायर आदी हुकमी एक्के असतानाही पुण्याने अनेक वेळा हातातोंडाशी आलेली विजयाची संधी घालविली आहे.
एक मात्र नक्की आपले खेळाडू अपयशी होत असले तरी पुण्यातील क्रिकेट चाहते भरघोस प्रतिसाद देत या सामन्याला उपस्थित राहतात. शनिवारीही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. कारण या सामन्याची तिकिटे केव्हाच संपली आहेत.
 या तुलनेत मुंबईने चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्मा, ड्वेन स्मिथ, दिनेश कार्तिक, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू यांनी फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मुंबईचा वलयांकित खेळाडू सचिन तेंडुलकर याने गहुंजेवर चौफेर फटकेबाजी करावी अशीच त्याच्या असंख्य चाहत्यांची अपेक्षा आहे. गोलंदाजीत मिचेल जॉन्सन, लसिथ मलिंगा, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी यांच्यावर मुंबईची मुख्य मदार आहे.

सामना : मुंबई इंडियन्स वि. पुणे वॉरियर्स
स्थळ : सहारा स्टेडियम, गहुंजे
वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून

ऑरेंज कॅप
१. मायकेल हसी (चेन्नई सुपर किंग्स)          ५७४    
२. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)           ५७०
३. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ५०४
पर्पल कॅप
१. ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्स)             २१
२. विनय कुमार (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    २०
३. जेम्स फॉकनर (राजस्थान रॉयल्स)        १९
सर्वाधिक षटकार
१. ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    ४०
२. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)    २५
३. डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन पंजाब)    २०