IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनेघन याने साखरपुडा केला आहे. बऱ्याच कालावधीपासून त्याची प्रेयसी असलेली जॉर्जिया इंग्लंड हिच्याशी मिचेलने रविवारी साखरपुडा केला. गेल्या काही काळापासून या दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू होती. रविवारी त्यांनी या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेत साखरपुडा केला आणि लवकरच ते लग्न करणार आहेत.

मिचेल मॅक्लेनेघन IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना जॉर्जिया अनेकदा त्याला भेटण्यासाठी भारतात आली होती. या दोघांनी त्यांचे फोटो सोशल मिडीयावर अनेक वेळा शेअर केले आहेत. मिचेल आणि जॉर्जिया दोघांनी साखरपुड्याच्या बातमीला दुजोरादेखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला आहे. दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना साखरपुड्याची गोड बातमी दिली आहे.

मिचेलने न्यूझीलंडकडून ४८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ८२ बळी टिपले आहेत. तसेच २९ टी २० सामन्यात त्याने ३० गडी माघारी धाडले आहेत. त्याने २०१६ मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला आहे. मुंबई इंडियन्सकडूनही मिचेलने आपली कारकिर्द गाजवली आहे. मुंबईने २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये आयपीएल विजेतेपद पटकावले, त्यावेळी तो संघाचा भाग होता. २०१५ च्या अंतिम सामन्यात त्याने २५ धावांत ३ गडी बाद केले होते. तर २०१९ च्या अंतिम सामन्यात त्याने ४ षटकांत उत्तम गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. हा सामना मुंबईने एका धावेने जिंकला होता. २०१३ सालीदेखील मुंबईने विजेतेपद मिळवले होते, पण त्यावेळी मिचेलचा संघात समावेश नव्हता.