गुढी पाडवा म्हणजे नवे वर्ष आणि नवी उमेद जागवणारा उत्सवी सण! हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी व्यवसाय प्रारंभ, नवीन वस्तू खरेदी, ,सोने खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. सध्या करोनाच्या काळातही हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. क्रिकेटचा महोत्सव असलेल्या आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघानेही चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचे खेळाडू सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अर्जुन तेंडुलकर, रोहित शर्मा, आदित्य तरे, धवल कुलकर्णी यांनी मराठीतून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खाननेही सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून व्हिडिओ शेअर करत या शुभेच्छा दिल्या आहेत. आज आयपीएलमध्ये मुंबईचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवामुळे या सामन्यात जिंकून मुंबईचा संघ विजयी गुढी उभारणार का हे पाहणे, रंजक ठरेल.

 

आयपीएल 2021च्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव

आयपीएलच्या 14व्या मोसमातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आपल्या नावावर केला. आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (एमआय) 2 गडी राखून पराभव केला. सलग 9व्या मोसमात मुंबईने आपला पहिला सामना गमावला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने बंगळुरूसमोर 20 षटकात 9 गडी गमावत 159 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बंगळुरू संघाने 8 गडी गमावले खरे, पण सामना खिशात टाकला.