आयपीएलचा बारावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 23 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधला एक यशस्वी संघ मानला जातो. गेले काही वर्ष रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवत आहे. मात्र बाराव्या हंगामाच्या सुरुवातीला खुद्द मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या कर्णधाराची ट्विटर हँडलवर जाहीरपणे फिरकी घेतली आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं नावावर असलेला रोहित शर्मा आपल्या 264 धावांच्या सर्वोच्च खेळीसाठी ओळखला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेच्या अभिनव सिंहने स्थानिक शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळताना रोहितचा विक्रम मोडला. अभिनवने 265 धावांची खेळी केली. या घटनेनंतर मुंबई इंडियन्सने, ट्विटरवर रोहित शर्माला टॅग करत आम्हाला तुच्यापेक्षा चांगला खेळाडू मिळाला आहे असं म्हटलं आहे.

त्यामुळे आता आपल्याच संघाने घेतलेल्या फिरकीला रोहित शर्मा कसं प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.