‘नाव मोठं, पण लक्षण खोटं’ अशीच कामगिरी होत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला आपली पत राखण्यासाठी शनिवारी येथे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघापुढे सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा हा सामना मुंबईसाठी आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. घरच्या मैदानावर हैदराबाद संघाविरुद्ध अवघे ११९ धावांचे लक्ष्य गाठताना त्यांचा ८७ धावांत खुर्दा उडाला होता. या धक्क्यातून मुंबईचा संघ अद्याप सावरलेला नाही. त्यांचा कर्णधार रोहित शर्माने गेल्या पाच सामन्यांमध्ये २०पेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत. तीच स्थिती किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा यांच्याबाबत दिसून आली आहे. या तीन फलंदाजांबरोबरच सूर्यकुमार यादव, ईशान किशन, एव्हान लेविस, सिद्धेश लाड, आदित्य तरे यांच्याकडूनही मुंबईला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

गोलंदाजीत मयांक मरकडे, जसप्रित बुमरा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, अ‍ॅडम मिलने, मुस्ताफिझूर रेहमान यांच्यावर मुंबईची मोठी मदार आहे. मयांकने या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये १० बळी घेत लक्षवेधक कामगिरी केली आहे.

चेन्नईसाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा अजूनही विजयवीराची भूमिका अप्रतिमरीत्या बजावत असल्याचे सिद्ध झाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध २०६ धावांचे लक्ष्य चेन्नईला साध्य झाले, ते धोनीने शेवटच्या दोन षटकांत केलेल्या आक्रमक फटकेबाजीमुळेच. त्याच्याबरोबरच, या मोसमात सातत्याने शैलीदार फलंदाजी करणारे शेन वॉटसन, अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो यांच्यावरही चेन्नईची भिस्त आहे. मधल्या फळीत सुरेश रैना याच्याकडूनही त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहीर, दीपक चहार हे चेन्नईचे गोलंदाज प्रभावी व अचूक मारा करण्याबाबत ख्यातनाम आहेत. त्याचप्रमाणे वॉटसन, रैना, हरभजन सिंग व कर्ण शर्मा यांच्यावरही चेन्नईच्या आशा आहेत.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स