पुण्याकडून पत्करलेल्या पराभवाने मुंबई इंडियन्सच्या आयपीएल हंगामाचा प्रारंभ झाला, मात्र त्यानंतर ओळीने पाच सामने जिंकत आपल्या वर्चस्वाची चुणूक त्यांनी दाखवली आहे. दुबळ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारी दिमाखात नामोहरम करून वानखेडेवर सलग सहावा विजय नोंदवून गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवण्यासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे १९८ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य रोहित शर्माच्या मुंबईने सहजगत्या पेलले. इंग्लंडच्या जोस बटलरने ३७ चेंडूंत ७७ धावांची वादळी खेळी साकारत मुंबईचा विजयाध्याय लिहिला.

‘ऑरेंज कॅप’धारक नितीश राणाच्या सातत्यपूर्ण फलंदाजीच्या बळावर मुंबईची फलंदाजीची ताकद अधिक तेजस्वी वाटत आहे. यंदाच्या हंगामात राणाच्या खात्यावर २५५ धावा जमा आहेत. पंजाबविरुद्ध त्याने नाबाद ६२ धावा केल्या. हार्दिक आणि कृणाल हे पंडय़ा बंधू अष्टपैलू चमक दाखवत आहेत, तर यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल आपल्या अनुभवाच्या बळावर यशस्वीपणे किल्ला लढवत आहे. बटलरची फलंदाजीसुद्धा बहरात आहे.

लक्ष्य उभारण्यापेक्षा पाठलाग करूनच अधिक आत्मविश्वासाने विजय मिळवता येतो, ही गोष्ट मुंबईच्या पाचपैकी तीन विजयांतून अधोरेखित होते. मुंबईचा संघ कुण्या एका फलंदाजावर अवलंबून नाही, हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.

मुंबईच्या गोलंदाजांवर गुजरात लायन्स आणि पंजाबने जोरदार हल्ला चढवून त्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजीच्या विभागात गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. या संघात लसिथ मलिंगा, हरभजन सिंग आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे दर्जेदार गोलंदाज आहेत.

दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आतापर्यंतच्या वाटचालीत संजू सॅमसन आणि रिशभ पंत या युवा खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान लाभले आहे. सॅम बिलिंग्ज आणि करुण नायर यांनी मुंबईविरुद्ध अधिक जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. मागील सामन्यात बिलिंग्ज अपयशी ठरला होता, त्यामुळे दिल्लीची चिंता संपलेली नाही. त्यामुळे वानखेडेच्या फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर दिल्लीच्या फलंदाजांची परीक्षा ठरणार आहे. दिल्लीच्या संघाला मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरचा फायदा होऊ शकेल. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने ३१ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांच्यासह झहीर खान दिल्लीच्या गोलंदाजीची धुरा वाहतील.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी ईएसपीएन.