अपयश ही यशाची पहिली पायरी असते, यानुसार मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावल्यावर सलग चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज असेल. दुसरीकडे पंजाबची कामगिरी सातत्यपूर्ण होत नसून ते विजयाच्या मार्गावर येण्यासाठी प्रयत्नशील असतील.

मुंबई संघाचा विचार केला असता नितिश राणा हा आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत आला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनाही सूर गवसलेला आहे. गोलंदाजीमध्ये लसिथ मलिंगाला अजूनही अचूक मारा करण्यात अपयश आलेले आहे. पण अन्य गोलंदाजांकडून मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईने सातत्यपूर्ण कामगिरी केली तर त्यांना विजय मिळवणे कठीण जाणार नाही.

पंजाबच्या संघात फलंदाजांची कोणतीच कमतरता नाही. पण हशिम अमला, कर्णधार ग्लेन मॅक्सवेल, इऑन मॉर्गन आणि डेव्हिड मिलर या चारही अनुभवी फलंदाजांना आतापर्यंत आपली छाप पाडता आलेली नाही. गेल्या सामन्यात मनन व्होराने धडाकेबाज खेळी साकारत एकाकी किल्ला लढवला होता. त्यावेळी या चारही फलंदाजांनी व्होराला साथ दिली असती तर पंजाबला हैदराबादवर विजय मिळवता आला असता. त्यामुळे यापुढील सामन्यांसाठी या चारही फलंदाजांना अथक मेहनत घ्यावी लागणार आहे. पण व्होराकडून आता संघाच्या अपेक्षा उंचावल्या असतील. गोलंदाजीमध्ये मोहित शर्मा आणि अक्षर पटेल हे सातत्याने तिखट मारा करत आहेत, पण त्यांना अन्य गोलंदाजांकडून अजूनही अपेक्षित साथ मिळालेली नाही.

दोन्ही संघांचा विचार केला तर पंजाबपेक्षा मुंबईचे पारडे जड आहे. पण पंजाबमधील अनुभवी खेळाडूंनी लौकिकाला साजेशी फलंदाजी केली तर त्यांना विजय मिळवणे कठीण नसेल.