मुंबई इंडियन्स म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती रोहित शर्माची मुंबई पलटन. आयपीएल सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं तब्बल ५ वेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. आणि या सर्व विजयांमध्ये आणि मुंबई इंडियन्सच्या कामगिरीमध्ये कर्णधार रोहित शर्माचा सिंहाचा वाटा राहिला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यानंतर देखील MI चा आत्मविश्वास तसूभर देखील कमी झालेला नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी आख्खी मुंबई पलटन मैदानावर सरावसत्रात सहभागी झालेली दिसली. रोहित शर्मानं टीमच्या या स्पिरीटवर कौतुकाची थाप दिली आहे.

कॅप्टन्स कॉर्नरमध्ये रोहित शर्माशी गप्पा!

मंगळवारच्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यापूर्वी (MI vs KKR) मुंबई इंडियन्सनं कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ Captains Corner या कॅप्शनखाली पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स टीमचं कौतुक केलं. “पहिल्या सामन्यात खेळलेले काही फास्ट बॉलर्स दुसऱ्याच दिवशी पुन्हा फिटनेस ड्रिलसाठी मैदानावर आल्याचं पाहून फार आनंद झाला. हे नेहमीच चांगलं लक्षण असतं. आणि याच गोष्टीचा मुंबई इंडियन्सला सार्थ अभिमान आहे. आम्हाला सामना जिंकण्यासाठी स्वत:ला झोकून द्यायचं आहे. मग आम्ही सामना जिंकतो की हरतो हे महत्त्वाचं उरत नाही. आमच्यासाठी सामन्यासाठीची तयारी महत्त्वाची असते”, असं रोहित शर्मा म्हणाला.

 

लुप्त होत असलेल्या गेंड्यांच्या प्रजातींसाठी रोहित शर्माचा पुढाकार; RCB विरुद्धच्या सामन्यात घातले खास बूट

“मेंटेनन्सवर बरंच काम करावं लागणार आहे!”

रोहित शर्मानं यावेळी त्याच्या फिटनेसविषयी देखील मोकळेपणाने मत मांडलं. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची (गुडघ्याच्या मागच्या बाजूच्या स्नायूला) दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएलमधील काही सामने आणि नंतर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकांमधील काही सामन्यांना देखील रोहित शर्माला मुकावे लागले होते. ही बाब रोहितने स्वत: देखील गांभीर्याने घेतल्याचं दिसत आहे. “सध्या मी गेल्या ३ ते ४ महिन्यांमध्ये राखलेल्या माझ्या फिटनेसवर काम करत आहे. गेल्या IPLमध्ये मला दुखापत झाली होती. त्यामुळे फिटनेस राखण्यासाठी, विशेषत: हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यानंतर मला फिटनेस मेंटेनन्सवर बरंच काम करावं लागणार आहे”, असं रोहित म्हणाला आहे.

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची ‘ती’ लाजिरवाणी परंपरा कायम!

“२०० सामने खेळलो, दुप्पट करू शकेन!”

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी आत्तापर्यंत २०० IPL सामने खेळले आहेत. त्याबाबत विचारलं असता हसतच रोहित म्हणाला, “हा माझ्यासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. कदाचित मी अजून २०० सामने खेळून त्याच्या दुप्पट कामगिरी करू शकेन!”