25 September 2020

News Flash

विजयी लय कायम राखण्याचे मुंबईपुढे आव्हान

मुंबईच्या संघासाठी ही परिस्थिती काही नवीन नाही.

प्रारंभीच्या अपयशानंतर सूर गवसलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात पुन्हा दमदार कामगिरी करून विजयी लय कायम राखण्याचे आव्हान आहे. तीन वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी यंदाच्या मोसमाची सुरुवात अत्यंत खराब होती. अटीतटीच्या लढतींमध्ये अखेरच्या टप्प्यात तीनदा पराभूत झाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने तुफानी खेळी करीत संघाला पहिला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या त्या सामन्यात रोहितने झंझावाती ९४ धावा फटकावल्या होत्या. त्यात विंडीजच्या एव्हिन लेविसने ठोकलेल्या तडाखेबंद ६५ धावांमुळे संघाला ४६ धावांच्या फरकाने मिळालेला विजय सर्वच खेळाडूंचे मनोबल उंचावणारा होता. या उंचावलेल्या मनोबलासह मुंबईचे खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या प्रतिकारासाठी रविवारी मैदानात उतरणार आहेत. प्रारंभीच्या सामन्यांमध्ये रोहितला सूर गवसला नसल्याचाच परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला होता. त्याला सूर सापडताच मुंबईचा संघदेखील लयीत आला आहे. त्यामुळे रविवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात मुंबईसाठी रोहित हाच संघाचा तारणहार ठरू शकेल. त्याशिवाय किरॉन पोलार्ड तसेच हार्दिक आणि कृणाल पंडय़ा यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पोलार्ड हा दुखापतीतून सावरल्याची बाब संघासाठी खूपच दिलासादायक आहे. दुसऱ्या सामन्यात हार्दिकने ५ चेंडूंत साकारलेली १७ धावांची छोटीशी खेळीदेखील संघासाठी सकारात्मक संकेत देणारी आहे. तसेच बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहली आणि ए.बी.डी. व्हिलियर्सला झटपट गुंडाळण्यात यशस्वी झाल्याने मुंबईच्या गोलंदाजांचेदेखील मनोबल उंचावलेले आहे.

जसप्रीत बुमरा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, मुस्ताफिझूर रेहमान, मयांक मरकडे आणि कृणाल पंडय़ा यांच्या गोलंदाजीलादेखील आता धार चढू लागली आहे.

चारपैकी तीन सामन्यांत पराभव आणि एक विजय मिळाल्याने मुंबईच्या संघाकडे सध्या केवळ दोनच गुण असून ते सहाव्या स्थानावर आहेत; परंतु मुंबईच्या संघासाठी ही परिस्थिती काही नवीन नाही. यापूर्वीच्या मोसमांमध्येदेखील मुंबईच्या संघाने तळापासून शिखराकडे अनेकदा झेप घेतली आहे, तर राजस्थानचा संघ अद्याप वॉटसनच्या धडाकेबाज शतकी खेळीतूनच सावरलेला नसण्याची शक्यता आहे. वॉटसनच्या खेळीमुळेच चेन्नई सुपर किंग्जला राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळवणे शक्य झाले होते. त्यातून बाहेर पडायचे असल्यास कर्णधार अजिंक्य रहाणेला मोठी खेळी खेळून संघासमोर आदर्श घालून द्यावा लागणार आहे. तसेच संजू सॅमसनची फलंदाजी आणि जयदेव उनाडकटची गोलंदाजीदेखील तळपणे आवश्यक ठरणार आहे.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 1:52 am

Web Title: mumbai indians vs rajasthan royals
Next Stories
1 आयपीएलमध्ये लेगस्पिन गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधक
2 विजयपथावर परतण्याचे हैदराबादचे लक्ष्य
3 सावध ऐका पुढल्या हाका!
Just Now!
X