किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मिळवलेल्या रोमहर्षक विजयामुळे आत्मविश्वास दुणावलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ बुधवारी मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. मुंबईने मागील लढतीत सनरायझर्स हैदराबादकडून हार पत्करल्यामुळे बंगळुरूचे पारडे जड मानले जात आहे.

आयपीएल गुणतालिकेत सध्या बंगळुरूचा संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे आव्हान टिकवण्यासाठी बंगळुरूला प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरणार आहे. मोहालीत सोमवारी रात्री बंगळुरूने पंजाबवर एका धावेने रंगतदार विजय मिळवला. सलग तीन सामन्यांतील पराभवाची मालिका रोखून बंगळुरूने रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि पंजाबला पराभवाचा धक्का दिला. आता एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या घरच्या मैदानावर विजयाचे सातत्य राखण्याचाच त्यांचा निर्धार आहे.

या लढतीत सर्वाचे लक्ष बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीकडे असणार आहे. दोन शतके आणि चार अर्धशतके झळकावणारा कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत ५६१ धावांसह अग्रस्थानी आहे. त्याशिवाय ए बी डी’व्हिलियर्स,  सलामीवीर के. एल. राहुल,अष्टपैलू  शेन वॉटसनही चांगल्या फॉर्मात आहे.  गोलंदाजी ही बंगळुरूची चिंतेची बाब आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा संघ हैदराबादकडून पत्करलेल्या (८५ धावांनी) दारुण पराभवातून सावरण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईचा संघ १० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.बंगळुरूला हरवल्यास ते गुणतालिकेत आगेकूच करू शकतील.

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.