* मुंबई इंडियन्सचा ४ धावांनी विजय   *  रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक
वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाला साजेशी धडाकेबाज खेळी साकारली आणि साऱ्यांच्याच डोळ्यांचे पारडे फेडले. फक्त ३९ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करीत रोहितने नाबाद ७९ धावांची लाजवाब खेळी साकारली. त्यानंतर हरभजन सिंग आणि प्रग्यान ओझा यांनी कळस चढवला. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने किंग्ज ईलेव्हन पंजाबचा ४ धावांनी पराभव केला. पण अखेरच्या षटकांत प्रवीण कुमारने १५ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकारांनिशी २४ धावांची खेळी केल्यामुळे मुंबईला या विजयासाठी अखेरच्या चेंडूपर्यंत झगडायला लागले. रोहितच्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्सने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
ऑफ-स्पिनर हरभजन सिंग आणि डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा यांच्या फिरकीपुढे पंजाबचा निभाव लागला नाही. ४-०-१४-३ असे हरभजनच्या गोलंदाजीचे लक्षवेधक पृथक्करण होते. पंजाबकडून डेव्हिड मिलरने ३४ चेंडूंत एक चौकार आणि ५ षटकारांसह ५६ धावांची खेळी साकारून एकाकी झुंज दिली, तर कप्तान डेव्हिड हसीने ३४ धावा केल्या.
तत्पूर्वी, प्रारंभी धिम्या गतीने रडत-खडत खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने अनपेक्षितरीत्या २० षटकांत ३ बाद १७४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मुंबईचा तिसरा फलंदाज बाद झाला तेव्हा धावफलकावर १२.२ षटकांत ८६ धावा झळकत होत्या. त्यावेळी मुंबई जेमतेम सव्वाशे धावसंख्येपर्यंत मजल मारेल, अशी चिन्हे दिसत होती. पण अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये रोहित शर्माने किरॉन पोलार्डच्या साथीने सारे चित्रच पालटून टाकले.
वानखेडे स्टेडियमवर पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात रोहितने ज्या दिमाखात फलंदाजी केली, त्याचीच पुनरावृत्ती सोमवारी पुन्हा एकदा क्रिकेटरसिकांना अनुभवता आली. सचिन तेंडुलकर (९) निराशा केल्यानंतर दिनेश कार्तिक (२५) आणि ड्वेन स्मिथ (३३) यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला, पण धावांची गती कमालीची मंद होती. परंतु प्रभारी संघनायक रोहितला अजिबात मंजूर नव्हते. त्याला दुसऱ्या टोकाकडून पोलार्डने छान साथ दिली आणि चौथ्या विकेटसाठी ८८ धावांची नाबाद भागीदारी रचली. पोलार्ड १३ धावांवर असताना मनप्रीत गोनीने त्याचा त्रिफळा उडवला. पण तिसऱ्या पंचांनी हा चेंडू नोबॉल ठरविल्यामुळे पोलार्डला जीवदान मिळाले.
पंजाबचा कप्तान डेव्हिड हसीच्या अखेरच्या षटकात रोहित धावांचा अक्षरश: पाऊस पाडत २७ धावांची बरसात केली. रोहितने पहिल्या चेंडूवर लाँग ऑनला, तिसऱ्या चेंडूवर मिड विकेटला आणि चौथ्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार खेचले. अखेरच्या पाच षटकांत मुंबई इंडियन्सने ७२ धावा काढल्या, त्यामुळेच त्यांना ही समाधानकारक मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स :  २० षटकांत ३ बाद १७४ (ड्वेन स्मिथ ३३, दिनेश कार्तिक २५, रोहित शर्मा ७९, किरॉन पोलार्ड २०; प्रवीण कुमार १/२४) विजयी वि. किंग्ज ईलेव्हन पंजाब : २० षटकांत सर्व बाद १७० (डेव्हिड हसी ३४, डेव्हिड मिलर ५६, प्रवीण कुमार २४; हरभजन सिंग ३/१४, प्रग्यान ओझा २/२२, मिचेल जॉन्सन २/२९)

वानखेडेवरून
झुंज दोन्ही संघनायकांविना!
मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन यांच्यात सोमवारी झालेल्या सामन्यात अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली, ती दोन्ही संघांच्या नियमित संघांची. योगायोगाची गोष्ट म्हणजे दोन्ही कप्तान हे ऑस्ट्रेलियाचे. मुंबईचा रिकी पॉन्टिंग तर पंजाबचा अॅडम गिलख्रिस्ट. मागील दोन सामन्यांत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला नशिबाची साथ मिळून विजयश्री पदरी पडत आहे. त्या आधीच्या सहा सामन्यांत पॉन्टिंगने फक्त ५२ धावा काढल्या होत्या. याशिवाय मागील सामन्यात ड्वेन स्मिथने अष्टपैलू कामगिरी बजावून आपले स्थान संघात निश्चित केले. या सर्व कारणास्तव सलग तिसऱ्या सामन्यात पॉन्टिंगशिवाय मुंबई इंडियन्सचा संघ उतरला. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाब गिलख्रिस्टच्या अपयशी कामगिरीमुळे चिंतेत होते. आठ सामन्यांत फक्त ९४ धावा काढणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाज गिलख्रिस्टला संघातून डच्चू मिळणार, अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणेच सोमवारी गिलख्रिस्टला वगळल्यामुळे नेतृत्वाची धुरा अनुभवी डेव्हिड हसीकडे सोपविण्यात आली.
 
‘रोहित, मुझसे शादी करोगे क्या?’
आयपीएल ट्वेन्टी-२० स्पध्रेचा हंगाम बहरला की मुंबईच्या रोहित शर्माचा फलंदाजीचा रुबाब हा पाहण्याजोगा असतो. गेली अनेक वष्रे आयपीएलमध्ये सातत्याने फलंदाजी करणारा रोहित यंदाही फॉर्मात आहे. सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने यंदाच्या हंगामातील चौथे अर्धशतक झळकावले. रोहितकडे सध्या मुंबई इंडियन्सचे प्रभारी कर्णधारपदही चालून आले आहे. या पाश्र्वभूमीवर वानखेडेवरील सामन्यात दिवेचा स्टँडवरील ‘रोहित, मुझसे शादी करोगे क्या?’ अशा आशयाचा फलक सर्वाचे लक्ष वेधत होता.

पोलार्डचा अफलातून झेल
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज शॉन मार्शने प्रग्यान ओझाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकण्यासाठी मारलेल्या फटक्यावर वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेटरसिकांना एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. लाँग ऑन सीमारेषेवर उभ्या मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डने हनुमानउडी घेत एक हाती झेल टिपून साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबई इंडियन्स संघाने मग एक अनोखा जल्लोष साजरा केला. किंग्ज इलेव्हन पंजाबची मालकीण प्रीती झिंटाला क्षणभर मैदानावर काय घडले, ते कळलेच नाही. आयपीएलच्या सहाव्या पर्वात चेपॉक स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात पोलार्डने महेंद्रसिंग धोनीचा असाच सीमारेषेवर अफलातून झेल टिपला होता.
    -के. प्रशांत

गुणतालिका: आयपीएल २०१३