सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील विलास रांगणेकर क्रीडा नगरीमध्ये सुरू झालेल्या कुमार व कुमारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारांच्या ‘अ’ गटात मुंबई शहर संघाने औरंगाबाद संघाचा १०-५ असा पराभव केला. मध्यंतराला मुंबईकडे ५-१ अशी आघाडी होती. ‘फ’ गटातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जळगावने साताऱ्याचा ११-१० असा अवघ्या एक गुणाने विजय मिळवला. मध्यंतराला जळगावकडे ८-६ अशी आघाडी होती. जळगावच्या विशाल रणदिवेने, तर साताऱ्याच्या सिद्धार्थ तारळेकरने दमदार खेळ केला.

किशोरींमध्ये ‘इ’ गटात ठाणे संघाने यजमान सिंधुदुर्गवर २४-१९ अशी मात करून विजयी सलामी दिली. मध्यंतराला ठाण्याकडे १७-६ अशी आघाडी होती. ठाण्याच्या चताली बोऱ्हाडे व दर्शना सणस यांच्या चौफेर चढायांनी हा विजय मिळवून दिला. त्यांना मेघना खेडेकर व माधुरी गवंडी यांनी उत्कृष्ट पकडींची साथ दिली. सिंधुदुर्गच्या स्नेहा टिळवे व मेहराज सय्यद यांनी चांगला खेळ केला. त्यांना मनीषा देसाई व निकिता राऊत यांनी उत्कृष्ट पकडी घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. ‘फ’ गटात साताऱ्याने रायगडचा ३८-१४ असा धुव्वा उडवत विजय मिळवला. सातारा संघाच्या प्रज्ञा भोईटे व अलिशा पटेल यांनी चौफेर चढाया व संजोती सावनुरने केलेल्या पकडी या सातारा संघाचे वैशिष्टय़ ठरल्या.

किशोर गटात मुंबई उपनगरने पुणे संघावर ४२-२६ अशी मात केली. या सामन्यात उपनगरने पुण्यावर सुरुवातीपासूनच दबाव ठेवला होता. या दबावातून पुणे संघ बाहेर येऊ शकला नाही. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उपनगरच्या संतोष कदम व रामबच्चन यांनी आपल्या उत्कृष्ट चढायांच्या जोरावर संघाला आघाडी मिळवून दिली. त्यांना दत्तू अडसूळ व सत्यविजय बागल यांनी कसबदार पकडींची छान साथ दिली. पुण्याच्या संकेत बालवडकर, महेश बालवडकर यांनी काहीसा प्रतिकार केला.

अहमदनगरने जालनावर ३५-२३ अशी मात केली. नगरच्या गणेश चितळे, प्रशांत साळुंके यांनी नेत्रदीपक चढाया करीत चांगला खेळ केला. जालन्याच्या प्रदीप राठोड व गणेश राठोड यांनी झुंजार खेळ केला. अंबादास गीतेने त्याला चांगली साथ दिली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या रत्नागिरीने कोल्हापूरचा १७-६ असा पराभव केला. मध्यंतराला रत्नागिरीच्या सोहन कमगुटवारने केलेल्या पकडींच्या जोरावर हा विजय मिळवला.

किशोरी गटात पुणे जिल्हा संघाने अहमदनगर संघावर १९-१० अशी मात करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पुण्याच्या पूनम तांबेने चौफेर चढाया व सत्यवा हळदकेरीने घेतलेल्या पकडींच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर नगरच्या स्नेहल खंडागळेने चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
सांगलीने पालघरला २६-१४ असे हरवले. सांगलीच्या मेगाराणी खोतने चांगला खेळ केला, तर पालघरच्या सुवर्णा पाटीलने आपला उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुंबईने सोलापूरचा ४२-१४ असा धुव्वा उडवत विजयी घोडदौड सुरू केली. मुंबईच्या तेजश्री सारंग व सुधा पवार यांनी चांगला खेळ केला. तर त्यांना कोमल दोगडेने उत्तम साथ दिली. सोलापूरच्या वंदना पवार, किरण नवले व रसिका गायकवाड यांनी चांगला खेळ केला.