मुंबई कबड्डी संघटनेच्या निवडणुकीसाठी ७८ उमेदवारी अर्ज

मुंबई : मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली असून, मंगळवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण ७८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या सत्तेत असलेल्या मारुती जाधव पॅनेलच्या भाई जगताप यांना कृष्णा तोडणकर पॅनेलच्या सचिन अहिर यांचे अध्यक्षपदासाठी आव्हान उभे राहणार आहे. गेल्या निवडणुकीत जाधव पॅनेलशी लढत देणारे अनिल घाटे पॅनेल यांची जाधव पॅनेलशी युती झाल्याचे म्हटले जात आहे.

२०१४-१५ मध्ये झालेल्या गेल्या निवडणुकीत जाधव पॅनेलने घाटे पॅनेलचा धुव्वा उडवून मुंबई कबड्डी संघटनेवरील सत्ता अबाधित राखली होती. परंतु जाधव पॅनेलमध्ये फूट पडल्यामुळे राजेश पाडावे यांच्या नेतृत्वाखालील तोडणकर पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीची उत्कंठा वाढली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत शिवसेना नेते सुनील शिंदे तोडणकर पॅनेलकडून लढणार अशी चर्चा होती. परंतु त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेत नव्याने सामील झालेल्या सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली तोडणकर पॅनेलने सत्तेचे समीकरण आखले आहे.

गेल्या निवडणुकीतील विरोधी पक्ष घाटे पॅनेलने दोघांच्या भांडणात त्रयस्थ राहून तिरंगी लढत होण्यापेक्षा वैचारिकतेला प्राधान्य देत जाधव पॅनेलशी हातमिळवणी केल्याचे म्हटले जात आहे. याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संघटनेचे धर्मादाय आयुक्तालयात असलेल्या खटल्यांसदर्भातील वाद सामोपचाराने मिळवण्याचीही चर्चा झाली आणि त्यासंदर्भात एक समिती स्थापन करून तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे जाधव आणि घाटे पॅनेल एकत्रित आल्याचे म्हटले जात आहे. परंतु या दोन्ही पॅनेलकडून किती जागा लढल्या जाणार आहेत, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.