मुंबई कबड्डी निवडणूक

मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मारुती जाधव गटाने कृष्णा तोडणकर गटावर २५-० अशी मात करून वर्चस्व गाजवले. या निवडणुकीत अनिल घाटे गटाशी केलेली युती, योग्य उमेदवारांची निवड, दादर-प्रभादेवीच्या बालेकिल्ला आणि अन्य महिला संघांची मते जाधव गटासाठी निर्णायक ठरली.

जाधव गटाकडून मनोहर इंदुलकर आणि विश्वास मोरे सर्वाधिक २८५ मतांनी निवडून आले, तर नितीन विचारे हा मतसंख्येनुसार २५वा विजयी उमेदवार ठरला. त्यांना २४९ मते मिळाली. निवडणुकीत पराभूत झालेल्या तोडणकर गटाकडून सर्वाधिक २३० मते ही सचिन अहिर यांना मिळाली. म्हणजेच १९ मतांनी अहिर यांना विजयाने हुलकावणी दिली. जाधव गटाला या निवडणुकीत सरासरी २६६ मते मिळाली, तर तोडणकर गटाला सरासरी १९७ मते मिळाली. म्हणजेच जाधव आणि तोडणकर गटातील वर्चस्वात ६९ मते निर्णायक ठरली. यात घाटे गटाचा सरासरी ३५ मतांचा निर्णायक वाटा आहे, असे कबड्डीतील जाणकारांचे म्हणणे आहे. घाटे गटाचे अनिल घाटे, मनोहर साळवी आणि मिलिंद कोलते हे तीन उमेदवार निवडून आले आहेत.

जाधव गटाने उमेदवारांची निवड करताना काळजी घेतली. मैदानावरील कार्यकर्ते, मातब्बर कबड्डीपटू आणि प्रशिक्षक यांची सुव्यवस्थित मोट बांधली. लोअर परेल आणि डीलाइल रोड परिसरातील मतांचे विभाजन होणार हे गृहीत धरून दादर-प्रभादेवीच्या बालेकिल्ल्यावर नियंत्रण ठेवले, हेच त्यांच्या पथ्यावर पडले.

आवाज कुणाचा, पण मत कुणाला..?

तोडणकर गटाचा ‘शिवसेना पुरस्कृत’ हा दावा या निवडणुकीत अपयशी ठरला. या निवडणुकीच्या दृष्टीने सचिन अहिर यांना रिंगणात आणून आदित्य ठाकरे, हेमांगी वरळीकर, विशाखा राऊत, सुनील शिंदे, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, मंगेश सातमकर, अजय चौधरी आणि हरीश वरळीकर यांनी भारतीय क्रीडा मंदिर परिसरातील कबड्डी संघटनेच्या कार्यालयाला भेट देऊन उमेदवारांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसेना नेत्यांच्या या चढाया निष्फळ ठरल्या. कारण शिवसेनेशी नाते सांगणाऱ्या अनेक मतदारांनी तोडणकर गटाचे बिल्ले लावून नेत्यांचे सन्मानाने स्वागत केले, परंतु मत देताना मात्र जाधव गटावरच शिक्का मारणे पसंत केले.