09 August 2020

News Flash

विदर्भाच्या हॅट्ट्रिकच्या वाटचालीत मुंबई, कर्नाटकचे आव्हान

प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

मुंबईचा अजिंक्य रहाणे (म्डावीकडे) आणि पृथ्वी शॉ सराव करताना.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या लिलावाआधी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा झाल्याने यंदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला आधीच उशीर झाला आहे. सोमवारपासून देशातील गुणवत्तेचा शोध घेणाऱ्या रणजी हंगामाला प्रारंभ होत असून, चंडीगड या नव्या संघासह एकूण ३८ संघांमध्ये पुढील तीन महिने या लढती चालतील. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाचा संघ हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाला आहे, तर कर्नाटक आणि मुंबई हे या स्पर्धेतील बलाढय़ संघसुद्धा तयारीनिशी उतरत आहेत.

आम्ही अनपेक्षितपणे जिंकलेलो नाहीत, हेच आम्हाला सिद्ध करायचे आहे, असे विदर्भाचा कर्णधार फैझ फझलने मागील हंगाम सुरू होण्याआधीच सांगितले होते. त्याप्रमाणे सलग दुसऱ्या हंगामात विदर्भाने जेतेपद पटकावले. त्यामुळे मुंबईनंतर रणजी जेतेपदाची हॅट्ट्रिक साधणारा दुसरा संघ विदर्भ ठरू शकेल. परंतु हे आव्हान इतके सोपे नसेल. यंदाच्या हंगामात विजय हजारे आणि मुश्ताक अली अशा दोन्ही मर्यादित षटकांच्या स्पर्धा जिंकणाऱ्या कर्नाटकचे त्यांच्यापुढे प्रमुख आव्हान असेल. २०१४-१५नंतर कर्नाटकचा संघ रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठू शकलेला नाही. पण यंदा लोकेश राहुल, मनीष पांडे, करुण नायर, मयांक अगरवाल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या बळावर हा संघ जेतेपदावर दावेदारी करू शकेल, अशी आशा आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ ४२व्या जेतेपदासाठी उत्सुक आहे. २०१५-१६मध्ये त्यांनी अखेरची जेतेपदे पटकावले होते. पुढील वर्षी गुजरातने त्यांना अंतिम फेरीत नामोहरम केले होते. या संघाकडे गेल्या काही वर्षांत जेतेपदे नसली, तरी समतोल संघ आहे. बडोद्याविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी मुंबईच्या १५ सदस्यीय संघात कसोटी विशेषज्ञ अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर पृथ्वी शॉ यांचा समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शिवम दुबे यांची भारतीय संघात निवड झाल्यामुळे मुंबईच्या संघाला त्यांची उणीव भासेल.

याशिवाय गुजरात, पंजाब, केरळ, बंगाल, राजस्थान आणि तमिळनाडूसुद्धा शर्यतीत असतील.

कसोटीपटूंचा कस लागणार

कसोटी विशेषज्ञ फलंदाज चेतेश्वर पुजारा रणजी स्पर्धेकडे गांभीर्याने पाहात आहे, तर पृथ्वी शॉ भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तोवर विश्रांती मिळालेल्या पुजारा (सौराष्ट्र), अजिंक्य रहाणे (मुंबई), मयंक अगरवाल (कर्नाटक), रविचंद्रन अश्विन (तामिळनाडू), उमेश यादव (विदर्भ) आणि इशांत शर्मा (दिल्ली) यांना सामन्यातील सरावाची संधी या मिनित्ताने मिळणार आहे.

रणजी करंडक स्पर्धेचा ८६वा हंगाम

* स्पर्धेचा कालावधी : ९ डिसेंबर २०१९ ते १३ मार्च २०२०

* एकूण संघ : ३८

* नवा संघ : चंडीगड

* स्पर्धेची पद्धती : अ, ब, क आणि प्लेट अशा चार गटांमध्ये विभागण्यात आलेले ३८ संघ गटसाखळी सामने खेळतील. ‘अ’ आणि ‘ब’ गटांमध्ये प्रत्येकी नऊ तर ‘क’ आणि प्लेट गटात प्रत्येकी १० संघांचा समावेश आहे. ‘अ’ आणि ‘ब’ या दोन्ही गटांमध्ये (एकत्रितपणे) सर्वाधिक गुण मिळवणारे पाच संघ उपांत्यपूर्व फेरीस पात्र ठरतील. ‘क’ गटातून दोन आणि प्लेट गटातून एक संघ उपांत्यपूर्व फेरी गाठू शकेल.

स्पर्धेची गटवारी

* अ-गट : आंध्र प्रदेश, बंगाल, दिल्ली, गुजरात, हैदराबाद, केरळ, पंजाब, राजस्थान, विदर्भ

* ब-गट : बडोदा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मुंबई, रेल्वे, सौराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश

* क-गट : आसाम, छत्तीसगड, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, सेनादल, त्रिपुरा, उत्तराखंड

* प्लेट गट : अरुणाचल प्रदेश, बिहार, चंडीगड, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम

आजचे सामने

* मुंबई वि. बडोदा

* महाराष्ट्र वि. हरयाणा

* विदर्भ वि. आंध्र प्रदेश

* रेल्वे वि. उत्तर प्रदेश

* सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 1:08 am

Web Title: mumbai karnataka challenge for vidarbha hat trick abn 97
Next Stories
1 सेनादलाच्या मोहित राठोडला विजेतेपद
2 Video : ढिसाळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विराटने दाखवून दिलं, असा पकडतात झेल…
3 …आणि तोंडावर बोट ! कोहलीला बाद करत केजरिक विल्यम्सने केला हिशेब चुकता
Just Now!
X