१७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत रंगणाऱ्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रियम गर्गकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं असून ध्रुव चंद जुरेल संघाचा उप-कर्णधार असणार आहे. याव्यतिरीक्त मुंबईच्या अथर्व अंकोलेकर, यशस्वी जैस्वाल यांनाही भारतीय संघात स्थान मिळालं आहे.

गतविजेत्या भारतीय संघासमोर यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपान या संघांचं आव्हान असणार आहे. १९ जानेवारीला भारत श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. गेल्या हंगामात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.

असा असेल भारताचा संघ –

यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जोरेल (उप-कर्णधार आणि यष्टीरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील