सावंतवाडीच्या जिमखाना मदानावर दिवंगत विलास रांगणेकर क्रीडा नगरीमध्ये सुरु असलेल्या कुमार व कुमारी गट अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पध्रेत, कुमार गटात यजमान सिंधुदुर्गने गतविजेत्या मुंबईचा धुव्वा उडवला. या पराभवाने बलाढय़ मुंबईला साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला आहे.
सिंधुदुर्गने ही लढत २९-७ अशा फरकाने जिंकली. मध्यंतराला सिंधुदुर्गकडे ५-१ अशी आघाडी होती. अक्षय पाटील, गिरीश चव्हाणच्या चढाया आणि शुभम धुरीच्या पकडींच्या जोरावर सिंधुदुर्गने एकतर्फी विजय मिळवला.
जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या पुण्यालाही पराभवाचा धक्का बसला. परभणीने पुण्यावर १०-८ अशी मात केली. कोल्हापूर संघाने अटीतटीच्या लढतीत सांगली जिल्ह्यावर ५-३ असा अवघ्या दोन गुणांनी विजय मिळवत उपउपांत्य फेरीत धडक मारली. मध्यंतराला दोन्ही संघ शुन्य गुण संख्येवर एकमेकांची क्षमता आजमावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र शेवटच्या काही मिनिटात कोल्हापूरच्या सतिश ऐतवाडे व ऋषिकेश गावडे यांनी गुण मिळवले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना विनायक आरळकरने चांगली साथ दिली. दुसऱ्या अटितटीच्या सामन्यात पालघर संघाने रायगड संघाचा ६-३ असा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पालघर संघ १-३ असा पिछाडीवर होता. पालघरच्या रुपेश अधिकारी व रोशन वैती यांनी शेवटच्या काही मिनिटात जोरदार खेळ करीत आपल्या संघाला पिछाडीवरून विजय मिळवून दिला. रायगडच्या खेळाडूंनी सुरवातीपासून बचावाचे धोरण स्वीकारल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
किशोरी गटात, सोलापूरने यजमान सिंधुदुर्गचे आव्हान १०-९ असे संपुष्टात आणले. रायगड संघाने अहमदनगर संघाचा २०-१८ अशा अवघ्या दोन गुण फरकाने विजय मिळवित उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला रायगडकडे ८-६ अशी आघाडी होती. रायगडच्या प्रगती मुसळे व श्रध्दा पाटीय यांनी केलेल्या खोलवर चढायांच्या जोरावर हा सामना आपल्या बाजुला झुकविण्यात रायगडला यश आले. ठाणे जिल्हा संघाने नाशिक जिल्हा संघावर २५-१६ अशी मात करीत उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मध्यंतराला ठाणे जिल्ह्याकडे १३-३ अशी दहा गुणांची आघाडी होती. ठाण्याच्या शहाजहान शेख व शिल्पा गुडूळकर यांनी केलेल्या चौफेर चढाया व प्रमिला लहानगे व काजल जठार यांनी केलेल्या सुरेख पकडींच्या जोरावर हा सामना जिंकला. नाशिकच्या सानिका जोशी व ऐश्वर्या सुर्वे यांनी प्रतिकार केला.