मुंबई मॅरेथॉनचा आपलेपणा नाहीसा
दहशतवादी हल्ला असो वा कोणतेही संकट येवो.. एकमेकांच्या मदतीला धावून येणारे आणि प्रत्येक सणसमारंभात उत्साहाने सामील होणारे.. अशी मुंबईकरांची ओळख बनली आहे. मुंबई मॅरेथॉन शर्यतीचा दशकपूर्ती सोहळा रविवारी पार पडला. पण आतापर्यंत मुंबई मॅरेथॉन शर्यतीला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या मुंबईकरांची पावले मात्र मुंबई मॅरेथॉनसाठी वळलीच नाहीत. गुलाबी थंडीत, अंगावर बोचरे वारे झेलून स्पर्धकांचा उत्साह वाढवणाऱ्या चाहत्यांची संख्या फारच कमी होती. त्यामुळे मुंबईची ‘जान’ हरवली, असेच चित्र पाहायला मिळत होते. मात्र सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महागाई, भ्रष्टाचार यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा आक्रोश आणि मुंबईवरील प्रेमाचा नजराणा दशकपूर्तीच्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीद्वारे पाहायला मिळाला.
आतापर्यंत मुंबईकरांच्या आयुष्याशी एक वेगळे नाते मुंबई मॅरेथॉनने निर्माण केले आहे. दहा वर्षांच्या प्रवासात ही मॅरेथॉन जणू मुंबईकरांच्या आयुष्याचा भागच बनून गेली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, वरळी, माहिम, वांद्रे या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्पर्धकांना ‘चिअर-अप’ करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असायची. पण दोन-तीन वर्षांपासून छत्रपती शिवाजी टर्मिनस, मरिन ड्राइव्ह, दादर, माहीम येथील मोजके चाहते वगळता मुंबईकरांना या मॅरेथॉन शर्यतीचं फारसं सोयरसुतक नसावे, असेच चित्र दिसत आहे.
२००७मध्ये भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत निघालेल्या मिरवणुकीला जनसागर उसळला होता. मुंबईकरांच्या जीवनाशी भावनिक नाते निर्माण करणाऱ्या मुंबई मॅरेथॉन शर्यतीलाही तशीच गर्दी होणे अपेक्षित असते. पण गेल्या काही वर्षांपासून चाहत्यांच्या अल्प प्रतिसादामुळे मुंबई मॅरेथॉनचा आत्माच हरवला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पेडर रोडपर्यंतचा भाग हा कार्यालये आणि उच्चभ्रू वस्ती असणारा आहे. एरव्ही गजबजणाऱ्या या भागात रविवारी सुट्टीच्या दिवशी फिरकणाऱ्यांची संख्या फारच मोजकी असते. त्यामुळे उपनगरात ही शर्यत आयोजित केली तर चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.