ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केलं. भारतीय संघातील अनेक बडे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. नियमित कर्णधार मायदेशी परतला. तरीही टीम इंडियाने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवला.

भारताच्या या विजयावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या. “भारतीय क्रिकेट संघानं मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या यशस्वी नेतृत्वाखाली लढाऊ वृत्तीनं खेळून; ऑस्ट्रेलियातील मैदानावर यजमान संघाचा पराभव करुन मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल संघातील सर्व खेळाडूंचं अभिनंदन! विजयाची ही घोडदौड अशीच सुरु राहो, या शुभेच्छा!”, असं ट्विट त्यांनी केलं.

या आधी भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “दमदार अशा विजयासाठी टीम इंडियाचं खूप अभिनंदन! ही एक ऐतिहासिक घटना आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. गाबाच्या मैदानावर ३२ वर्षांनी ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा सामना करायला भारतीय संघाने भाग पाडले. पुन्हा एकदा साऱ्यांचे अभिनंदन!”, असं ट्विट त्यांनी केलं होते.