|| तुषार वैती

भारतीयांमध्ये टी. गोपी, सुधा सिंगचे जागतिक स्पर्धेत पात्रतेचे ध्येय; परदेशी धावपटूंमध्ये अबेरा कुमा, अमेनो गोबेना संभाव्य दावेदार

नववर्षांच्या तिसऱ्या रविवारी रंगणाऱ्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी अवघी मुंबई सज्ज झाली आहे. तंदुरुस्तीसाठी जागरूक असणाऱ्या मुंबईकरांना धावण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या मुंबई मॅरेथॉनचे १६वे पर्व २० जानेवारीला रंगणार असून केनिया-इथिओपियाच्या धावपटूंसह भारतीय धावपटूही देशातील सर्वोच्च अशा मुंबई मॅरेथॉनमध्ये आपले कौशल्य पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

मुंबई मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी अरुंद झालेले रस्ते, शेवटच्या १० किलोमीटरच्या टप्प्यात आड येणारे हौशे-नवखे धावपटू यावर तोडगा काढण्यासाठी विविध गटांच्या समाप्ती ठिकाणांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे अव्वल धावपटूंना विजयी रेषा पार करण्यात आता कोणतेही अडथळे येणार नाहीत. या वर्षी आशियाई तसेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा होणार असल्यामुळे अनेक धावपटूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धासाठी पात्र ठरण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे.

इथिओपियाचा अबेरा कुमा याच्यावर यंदा सर्वाच्या नजरा असतील. कुमाने गेल्या वर्षी लेक बिमा आणि रॉटरडॅम मॅरेथॉनमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्यासमोर केनियाचा इलोड किपचूग, मॅथ्यू किसोरियो तसेच इथिओपियाचा मोसिनेट गेरेमे, असेफा मेंगित्सू यांचे आव्हान असणार आहे. महिलांमध्ये गतविजेती इथिओपियाची अमाने गोबेनाला केनियाची ग्लॅडी शेरेनो, व्हिव्हियन चेरियूट तसेच इथियोपियाची रूटी अगा, तिरूनेश दिबाबा यांचा कडवा संघर्ष सहन करावा लागणार आहे.

पूर्ण मॅरेथॉनमध्ये आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व राहणार, हे निश्चित असले तरी भारतीयांमध्ये टी. गोपी, नितेंद्र सिंग रावत तसेच सुधा सिंग या अव्वल धावपटूंनी सप्टेंबर महिन्यात रंगणाऱ्या जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. पुरुषांना जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता २ तास १५ मिनिटे तर महिलांना २ तास ३५ मिनिटे ही वेळ देण्यात आली असली तरी मुंबई मॅरेथॉनमध्ये ही वेळ गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

ललिता बाबरने कौटुंबिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली असली तरी पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय महिलांमध्ये सुधा सिंग ही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे. सुधाने २०१६ आणि २०१८ मध्ये मुंबई मॅरेथॉनचे जेतेपद पटकावले होते. तिच्यासमोर २०१७च्या विजेत्या ज्योती गवतेचे आव्हान आहे. पुरुषांमध्ये  आशियाई मॅरेथॉनचे जेतेपद पटकावणारा गोपी थोनाकल तसेच २०१४ मध्ये मुंबई मॅरेथॉनमध्ये विक्रमी कामगिरी करणारा नितेंद्र सिंग रावत आणि २०१५चा विजेता करण सिंग यांच्यात जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. अर्धमॅरेथॉनमध्ये, भारतीय पुरुषांमध्ये कालिदास हिरवे आणि मान सिंग यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मंजू यादव, साईगीता नाईक,मोनिका आथरे यांच्या समावेशामुळे महिला गटातील रंगत आणखीन वाढली आहे.

  • शर्यत : रविवारी सकाळी ७ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १