मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाच्या वर्षातही केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंचं वर्चस्व पहायला मिळालं. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात मुख्य स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने बाजी मारली. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचं कडवं आव्हान मोडीत काढत मानाच्या मुंबई मॅरेथॉनचा किताब पटकावला. पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात पुरुषांमध्ये नितेंद्रसिंह रावतने पहिलं तर सुधा सिंहने महिलांच्या गटात पहिलं स्थान मिळवलं.पुरुषांमध्ये गोपी टी. ने दुसरं तर करणसिंहने तिसरं स्थान मिळवलं.

दुसरीकडे मुंबई मॅरेथॉनच्या 21 किलोमिटर हाफ मॅरेथॉन प्रकारात पुरुषांमध्ये श्रीनू मुगाता आणि महिलांमध्ये मीनू प्रजापती यांनी बाजी मारली आहे. हाफ मॅरेथॉन प्रकारात महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला तिसरं तर महिलांमध्ये महाराष्ट्राच्या साईगीता नाईकने दुसरं स्थान पटकावलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला धावपटूंनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

श्रीनू मुगाताने 1 तास 5 मिनीटं आणि 49 सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. महिलांमध्ये मीनू प्रजापतीने 1 तास 18 मिनीटं 5 सेकंद इतका वेळ घेतला. कालिदास हिरवे आणि साईगीता नाईक यांच्या रुपाने हाफ मॅरेथॉनवर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा पगडा पहायला मिळाला.