|| तुषार वैती

  • दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र
  • भारतीय पुरुषांमध्ये नितेंद्र सिंग रावतची जागतिक स्पर्धेची संधी थोडक्यात हुकली
  • पुरुषांमध्ये केनियाचा कॉस्मोस लागट तर महिलांमध्ये इथिओपियाची वर्कनेश अलेमू विजेती

कमी-अधिक प्रमाणात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभागी झालेल्या हौशे-नवशे तसेच अव्वल धावपटूंच्या सळसळत्या उत्साहासह मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीचे १६वे पर्व रविवारी पार पडले. भारतीय महिलांच्या गटात मध्य रेल्वेच्या सुधा सिंगने स्पर्धाविक्रमाची नोंद करत दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. पुरुषांमध्ये मात्र नितेंद्र सिंग रावतने विजेतेपद पटकावले असले तरी त्याची जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी अवघ्या काही सेकंदांनी हुकली. मुंबई मॅरेथॉनवर नेहमीप्रमाणेच केनिया आणि इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. पुरुषांमध्ये केनियाच्या कॉस्मोस लागटने तर महिलांमध्ये इथिओपियाच्या वर्कनेश अमेलूने विजेतेपदावर नाव कोरले.

रविवारचा दिवस असतानाही काही ठिकाणी प्रेक्षकांनी देशोदेशीच्या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी बऱ्यापैकी हजेरी लावली होती. मुंबई मेट्रोच्या कामामुळे अनेक मार्गात बदल करण्यात आल्यामुळे मोठमोठी वळणे घेताना धावपटूंची दमछाक होत होती. सकाळी ७.२० वाजता मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाल्यामुळे सकाळच्या गारव्याचा फायदा धावपटूंना घेता आला नाही. अध्र्या टप्प्यावर आल्यानंतर मात्र धावपटूंना मुंबईतील कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागला.

केनियाच्या कॉस्मोस लागटने इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडीत काढत विजेतेपदाला गवसणी घातली. ३५ किलोमीटरनंतर लागटने सर्व प्रतिस्पध्र्याना मागे टाकत घेतलेली आघाडी अखेपर्यंत टिकवत २ तास ०९ मिनिटे १५ सेकंद अशी वेळ नोंदवून विजेतेपदाचा मान पटकावला. इथिओपियाच्या आयच्यू बँटीला २ तास १० मिनिटे ०५ सेकंद अशा कामगिरीसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. इथिओपियाच्याच शूमेट अकालन्यूने २ तास १० मिनिटे १४ सेकंदांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला. ‘‘मी पहिल्यांदाच मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन जेतेपद पटकावल्याचा आनंद होत आहे. स्पर्धाविक्रम मोडण्याचा माझा इरादा होता, पण तो साध्य करता आला नसला तरी मी खूश आहे,’’ असे विजेतेपदानंतर लागटने सांगितले.

महिलांमध्ये इथिओपियाच्या वर्कनेश आणि गतविजेती अमाने गोबेना यांच्यात विजेतेपदासाठी चांगलीच चुरस रंगली होती. पण ३८ किलोमीटरनंतर वर्कनेशने गोबेनाला मागे सारत आगेकूच केली आणि २.२५.४५ सेकंद अशा कामगिरीसह जेतेपदावर नाव कोरले. गोबेनाला २.२६.०९ सेकंदांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. इथिओपियाची बिरके देबेलेने २.२६.३९ अशी वेळ देत तिसरा क्रमांक पटकावला.

पुरुषांमध्ये नितेंद्र सिंग रावत यांच्यासमोर टी. गोपीचे आव्हान होते. पण ३५ किलोमीटरनंतर गोपीच्या पायाचे स्नायू ताणले गेले. त्याने मध्येच थांबण्याचाही निर्णय घेतला. त्यामुळे नितेंद्रला आघाडी घेता आली. अखेर नितेंद्रने २.१५.५२ सेकंदांसह स्पर्धा जिंकली. दुखापतीनंतरही शर्यत पूर्ण करत गोपीने २.१७.०३ सेकंदांसह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. करण सिंगने २.२०.१० सेकंद अशी कामगिरी नोंदवत तिसरा क्रमांक मिळवला.

महिलांमध्ये गतविजेती सुधा सिंग बाजी मारणार, हे अपेक्षित असताना तिने सर्व चाहत्यांना अनपेक्षित असा धक्का दिला. वातावरण पोषक नसतानाही तिने स्पर्धाविक्रमासह जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याची करामत केली. तिने २.३४.५५ मिनिटे वेळ देत विजेतेपदावर नाव कोरले. सुधाचे हे मुंबई मॅरेथॉनचे तिसरे जेतेपद ठरले. परभणीच्या ज्योती गवतेला २.४५.४८ सेकंदांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जिग्मेट डोल्माने ३.१०.४२ सेकंदांसह तिसरा क्रमांक प्राप्त केला.

अन् शर्यत संचालकाच्या अंगावरच फलक कोसळला..

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजनात अनेक त्रुटी पाहायला मिळाल्या. बदललेल्या मार्गामुळे धावपटूंची पंचाईत होत होती, तर अखेरच्या टप्प्यात अनेक अव्वल धावपटूंना पाण्यासाठी कसरत करावी लागत होती. त्यातच शर्यतीच्या पहिल्या टप्प्यात वरळी सीफेसजवळ शर्यत संचालक ह्य़ू जोन्स हे दुचाकीवरून धावपटूंना मार्ग दाखवत असताना त्यांच्या अंगावर जाहिरातीचा फलक कोसळला. मग धावपटूंना अडचण होऊ नये, म्हणून त्यांनी दुचाकीवरून उतरून हा फलक बाजूला केला.

थोडय़ा फरकाने स्पर्धाविक्रम नोंदवता आला नाही, याचे दु:ख आहेच. पण विजेतेपदाचा आनंद साजरा करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही वेगाने धावत होतो, त्या वेळी ‘पेसर’ची उत्तम मदत मिळाली. अखेरच्या टप्प्यात काहीसे चढउतार आल्यामुळे अधिक चांगली वेळ देता आली नाही. आता लंडन मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याचा प्रयत्न राहील.     – नितेंद्र सिंग रावत, भारतीय पुरुष विजेता

गेली १० वर्षे मी सातत्याने हीच वेळ देत आहे. २ तास ४५ मिनिटे वेळ नोंदवू शकल्यामुळे आणि दुसऱ्या क्रमांकावर मजल मारता आल्याने मी आनंदी आहे. परभणी येथेच मी यापुढे सराव करणार असून फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दिल्ली मॅरेथॉनमध्ये यापेक्षाही चांगली वेळ नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहे.      – ज्योती गवते, भारतीय महिला उपविजेती