मुंबई मॅरेथॉनचे १७वे पर्व रविवारी रंगणार

तुषार वैती, लोकसत्ता

मुंबई : सध्या प्रत्येक जण आपल्या तंदुरुस्तीविषयी सजग होऊ लागला आहे. धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात आपले शरीर तंदुरुस्त राखण्याकडे प्रत्येकाचा कल वाढू लागला आहे. त्यातच प्रत्येक वर्षांच्या तिसऱ्या रविवारी रंगणाऱ्या हक्काच्या मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने आता सकाळच्या प्रहरी धावणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. गुलाबी थंडी त्यातही वाहणारे बोचरे वारे यांचा सामना करताना येत्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकही सज्ज झाले आहेत.

मुंबई मॅरेथॉनला दरवर्षी मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा रोडावत चालला असला तरी स्पर्धकांची वाढती संख्या ही समाधानाची बाब. यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांच्या संख्यात तब्बल १९ टक्क्यांनी वाढ झाली असून जवळपास ५५,३२२ धावपटू रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसतील. ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९,६६० धावपटू, २१ किमीच्या अर्धमॅरेथॉनमध्ये १५,२६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९,७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८,०३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १,०२२ आणि अपंगांच्या शर्यतीत १,५९६ धावपटू सहभागी होणार आहेत.

केनियाचा कॉसमस लगट आणि इथिओपियाची वर्कनेश अलेमू या गतविजेत्यांच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या वर्षी या दोघांनी मुंबई मॅरेथॉनमधील सर्वात वेगवान वेळेची नोंद केली होती. त्यामुळे विजेतेपद कायम राखण्यासाठी या दोघांनाच विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे.

भारतीयांमध्ये सेनादलाच्या श्रीनू बुगाथा आणि ऑलिम्पियन सुधा सिंग यांनी मुंबई मॅरेथॉनद्वारे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आपली जागा निश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्धमॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळे आणि मोनिका आथरे तसेच स्वाती गाढवे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत.

बोचऱ्या वाऱ्यांमुळे वेगावर परिणाम

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सकाळच्या वेळेला बोचरे वारे वाहू लागले आहेत. मुंबईत वाढलेल्या थंडीमुळे तसेच बोचऱ्या वाऱ्यांमुळे सहभागी धावपटू सुखावले आहेत. मुंबईतील पारा सकाळच्या वेळी २० अंश सेल्सियसच्या खाली आल्यामुळे यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धाविक्रमाची नोंद होणार असे बोलले जात आहे. मात्र सकाळच्या वेळी वांद्रे-वरळी सागरी सेतूवर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे धावपटूंच्या वेगावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘‘यंदा मुंबईतील वातावरण मॅरेथॉनसाठी सुखावह असले तरी कमीत कमी वेळेत शर्यत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. सकाळच्या वेळेला वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करावा लागला तर धावपटूंचा वेग मंदावू शकतो, पण पूर्ण मॅरेथॉनसाठी सध्याचे वातावरण उत्तम आहे,’’ असे माजी ऑलिम्पियन आनंद मेनेझिस म्हणाले.

या सुविधा असतील

अ‍ॅम्ब्युलन्स (११), वैद्यकीय सेवक (६००), वैद्यकीय केंद्रे (१२), पाणी मिळण्याची केंद्रे (२७), कूल स्पंज केंद्रे (११), स्वयंसेवक (२,५००), तैनात पोलीस (९,०००), विरारहून सकाळी २.२० वा. स्पेशल ट्रेन.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, हॉटस्टार ’ प्रक्षेपणाची वेळ : सकाळी ७ ते ११.३०.