News Flash

नव्या स्पर्धा विक्रमासाठी मुंबई धावणार

मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारीला; वाढत्या गारव्याचा खेळाडूंना फायदा

मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे भारतीय खेळाडू. त्सेतान डोलकर (डावीकडून), जिगमेट डोल्मा, ज्योती गवते, खेता राम, एलाम सिंग व मो. युनास

मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारीला; वाढत्या गारव्याचा खेळाडूंना फायदा

मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असलेली मुंबई मॅरेथॉन शर्यत येत्या रविवारी पार पडणार आहे. तापमानात घसरण झाल्यामुळे मुंबईकरांना हुडहुडी भरली असली तरी हा गारवा सहभागी धावपटूंना नवा स्पर्धा विक्रम नोंदवण्याची ऊर्जा देणारा ठरणार आहे. एरवी मुंबईतील तापमानाच्या तक्रारींचा पाढा वाचणारे धावपटू यंदा मात्र आनंदात दिसत आहेत. इथिओपियाची दिनकेंश मेकाश आणि पहिल्यांदाच मुंबईत धावणारा केनियाचा लेव्ही मॅटेबो यांच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

रिओ ऑलिम्पिकपटू ललिता बाबर, सुधा सिंग, ओ. पी. जैशा व कविता राऊत यांनी मुंबई मॅरेथॉनमधून माघार घेतल्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे. मात्र मोनिका आथरे, ज्योती गवते आणि श्यामली सिंग यांच्या रूपाने भारतीय गटातील नवीन विजेती यंदा मिळणार आहे. भारतीय पुरुष गटात गतविजेत्या नितेंद्र सिंग रावतच्या अनुपस्थितीत ऑलिम्पिकपटू खेता राम जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून सकाळी ७.२० वाजता पूर्ण मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. परदेशी धावपटूंमध्ये जेतेपदाचा दावेदार असलेल्या इथिओपियाच्या आयेले अ‍ॅबशेरोने माघार घेतल्यामुळे २७ वर्षीय मॅटेबो नव्या स्पर्धा विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झाला आहे. गतवर्षी केनियाच्याच गिडीओन किपकेटरने २ तास ०८ मिनिटे ३५ सेकंदांची वेळ नोंदवून जेतेपदासह स्पर्धा विक्रमही आपल्या नावावर केला होता. मात्र त्याच्या अनुपस्थित मॅटेबोने हा विक्रम मोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मॅटेबोने २०११ मध्ये फ्रँकफर्ट मॅरेथॉनमध्ये २ तास ५ मिनिटे १६ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. त्यामुळे किपकेटरच्या विक्रमाला मागे टाकण्यासाठी तो उत्सुक आहे.

‘‘मार्गाची पाहणी केल्यानंतर शर्यतीतील डावपेचांची आखणी मी करणार आहे, पण स्पर्धा विक्रम नोंदवण्याचे माझे लक्ष्य आहे. ऑक्टोबर महिन्यात अखेरच्या शर्यतीत सहभाग घेतला होता. त्या शर्यतीत मला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी रविवारी येथे दोन तास ०८ मिनिटांच्या आत शर्यत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल,’’ असे मॅटेबो म्हणाला. त्याच्यासमोर इथिओपियाच्या सेबोका डिबाबा, केनियाच्या जेकब चेसरी यांचे कडवे आव्हान आहे. गतवर्षी डिबाबाला (०२:०९:२० से.) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते आणि यंदा तोही जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे.

महिला गटात इथिओपियाची मेकाश तिसऱ्यांदा येथे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने २०१४ आणि २०१५ मध्ये येथे जेतेपद पटकावले होते. २ तास २३ मिनिटे १२ सेकंद ही तिची सर्वोत्तम कामगिरी असून मुंबई मॅरेथॉनमध्ये व्हॅलेटाइन किपकेटरने २०१३ साली नोंदवलेल्या २:२४:३३ सेकंदांचा विक्रम तिला खुणावत

आहे. ‘‘ या स्पध्रेत तिसऱ्यांदा मी सहभाग घेत आहे आणि त्यामुळे मार्गाची चांगली जाण आहे. ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे,’’ असे मेकाश म्हणाली.

  • स्पर्धक : ४२,३७९
  • पूर्ण मॅरेथॉन : ६,३४२
  • अर्ध मॅरेथॉन : १४,६६३
  • ड्रिम रन : १९,९८०
  • ज्येष्ठ नागरिक : ९२१
  • दिव्यांग स्पर्धक : ४३३
  • पोलीस चषक संघ : ४०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 2:34 am

Web Title: mumbai marathon 4
Next Stories
1 प्रीमिअर बॅडमिंटन लीग: सिंधूने केली सायना नेहवालवर मात
2 ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू युट्यूबवरून गिरवतोय अश्विनच्या फिरकीचे धडे!
3 बेपत्ता मुलाच्या मदतीसाठी मोहम्मद कैफचा पुढाकार
Just Now!
X