तुषार वैती

तमाम मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आणि जगाच्या नकाशावर मुंबईचे नाव आणखीन उज्ज्वल करणारी मुंबई मॅरेथॉन शर्यत यंदा फेब्रुवारीनंतर होण्याची चिन्हे आहेत. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारकडून मंजुरी मिळण्यात विलंब होत असल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन लांबणीवर पडले आहे.

थंडीची चाहूल लागली की मुंबईकरांची पावले आपसूकच धावण्याकडे वळतात. मुंबई मॅरेथॉनची तयारी हा त्यामागील मुख्य हेतू. यंदा थंडीला सुरुवात होऊन मुंबईकर आपली तंदुरुस्ती जपण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीसह मैदानांकडे वळले आहेत. पण मुंबई मॅरेथॉन शर्यत कधी रंगणार, हाच प्रश्न त्यांना सतावत आहे.

जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी होणारी मुंबई मॅरेथॉन १७ जानेवारी २०२१ रोजी होणे अपेक्षित आहे, पण यंदा मुंबई मॅरेथॉनचा मुहूर्त १७ वर्षांनंतर प्रथमच हुकणार आहे. करोनामुळे देशातील सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. पण नवी दिल्लीत करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाही नोव्हेंबरमध्ये झालेल्या दिल्ली अर्धमॅरेथॉन शर्यतीमुळे मुंबई मॅरेथॉनच्या संयोजकांच्या आशा उंचावल्या आहेत. आता दिल्ली अर्धमॅरेथॉनचा प्रयोग मुंबईतही राबवण्याचे या दोन्ही शर्यतींचे संयोजक असलेल्या प्रोकॅम इंटरनॅशनलने ठरवले आहे. यंदा दिल्ली अर्धमॅरेथॉनच्या धर्तीवर मुंबई मॅरेथॉनमध्येही हौशी धावपटूंना प्रवेश देण्यात येणार नाही. फक्त व्यावसायिक धावपटूंसाठीच मुंबई मॅरेथॉन रंगणार असल्याची माहिती मिळत आहे.

‘‘मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनासाठी आम्ही आग्रही आहोत. मुंबई मॅरेथॉनमध्ये खंड पडू नये, यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. विविध मंजुरी मिळवण्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे प्रयत्न करत आहोत. जानेवारी महिन्यात मुंबई मॅरेथॉनचे आयोजन शक्य नसल्यामुळे ही स्पर्धा आता फेब्रुवारी किंवा त्यानंतर आयोजित करण्याचा आमचा मानस आहे,’’ असे प्रोकॅम इंटरनॅशनलकडून सांगण्यात आले.

मुंबईत करोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सरकारकडून सावधगिरी बाळगण्यात येत असल्यामुळेच सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाची दारे खुली करण्यात आलेली नाहीत. त्याचाच एक भाग म्हणून क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाविषयी राज्य सरकार साशंक आहे. म्हणूनच मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अद्याप हिरवा कंदील दाखवला जात नाही, असे समजते.

किमान कागदावर तरी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन नियोजित वेळापत्रकानुसार होणे अपेक्षित आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशात मॅरेथॉनच्या स्पर्धा आयोजित करणे सोपे होईल.

– आदिल सुमारीवाला, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष