जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात रंगणारी टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा ३० मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. करोनामुळे या शर्यतीच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. फेब्रुवारीमध्ये या स्पर्धेचा घाट घालण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र संयोजकांनी भर उन्हाळ्यात ही स्पर्धा आयोजित करत खेळाडूंच्या अडचणीत वाढ केली आहे.

‘‘सावधगिरीने पावले टाकत सर्वाशी चर्चा करून मोठय़ा आशेने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ आणि राज्य सरकार तसेच अन्य प्रशासकीय विभागांशी चर्चा करून एकत्रितपणे ही स्पर्धा आयोजित करण्याचे आम्ही ठरवले,’’ असे संयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलने पत्रकात म्हटले आहे.

‘‘केंद्र तसेच राज्य सरकारच्या प्रमाणित कार्यप्रणालीनुसार पूर्ण मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉन तसेच १० किमी शर्यत या तीन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत मर्यादित धावपटूंना प्रवेश देण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धक, स्वयंसेवक तसेच पदाधिकारी यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल,’’ असेही या पत्रकात म्हटले आहे.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी असल्यामुळे सर्व धावपटूंना नवीन तारखेविषयीची माहिती देण्यात आली आहे. तसेच स्पर्धेविषयीची अधिक माहिती, स्वरूप, नोंदणी, सुरक्षेविषयीचे नियम याविषयीची माहिती नंतर देण्यात येणार आहे.