रविवारची थंड पहाट, वातावरणाने धुक्याची दुलई लपेटून घेतलेली.. मात्र सीएसटीच्या दिशेने जाणारे रस्ते, बसेस, लोकलमध्ये टी-शर्ट आणि ट्रॅकसूट अशा पेहरावातले हजारो उत्साही धावपटूंचे जथ्थे जमा होत होते. विविध सामाजिक जाणिवांसाठी मदत म्हणून धावणारे सर्वसामान्य, बॉलीवूड तारेतारका, कॉर्पोरेट प्रभृती k11यांच्यासह व्यावसायिक धावपटूंनी मुंबईकरांच्या जल्लोषी पाठिंब्याला जागत मॅरेथॉनचे एक तपाचे वर्तुळ पूर्ण केले. या धावसोहळ्यात भारतीय महिला शर्यतपटूंनी आपला ठसा उमटवला .
आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकप्राप्त धावपटू ओ.पी. जैशाने मुंबई मॅरेथॉन पदार्पणातच अव्वल स्थानासह नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. जैशाने ४२ किलोमीटरचे अंतर २ तास, ३७ मिनिटे आणि २९ सेकंदांत पूर्ण करत व्हॅली सत्यभामा यांचा १९ वर्षांचा जुना विक्रम मोडला. जैशाने आठवे स्थान पटकावले. मुंबई मॅरेथॉनमध्ये जेतेपदांची हॅट्ट्रिक करणाऱ्या ललिता बाबरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यंदा ही शर्यत २ तास, ३८ मिनिटे, २१ सेकंदांत पूर्ण करत ललिताने गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ सेकंदांपेक्षा कमी वेळ घेत अंतिम रेषा गाठली. तिसरे स्थान पटकावणाऱ्या सुधा सिंगने २ तास, ४२ मिनिटे आणि १२ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. विशेष म्हणजे या तिघींनी ऑगस्टमध्ये बीजिंग (चीन) होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र k10ठरण्याचा मान मिळवला. या स्पर्धेसाठी २ तास, ४४ मिनिटांत शर्यत पूर्ण करणे अनिवार्य होते. डॉ. निकोलाई नेसारोव्ह यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी जैशा बीजिंगमध्ये पाच हजार आणि १० हजार मीटर, तर ललिता पाच हजार मीटर प्रकारात सहभागी होणार आहे.
पुरुषांमध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या (पुणे) करण सिंगने २ तास, २१ मिनिटे आणि ३५ सेकंदांत शर्यत पूर्ण करत भारतीयांमध्ये पहिले स्थान पटकावले. त्याचा सहकारी अर्जुन प्रधानने २ तास, २२ मिनिटे आणि २२ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. मूळच्या रांचीच्या आणि हैदराबादमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या बहादूर सिंग धोनीने २ तास, २२ मिनिटे आणि ४१ सेकंदांत शर्यत पूर्ण करताना तिसरे स्थान मिळवले.

इथिओपियाचे वर्चस्व
मुंबई मॅरेथॉनवर यंदा इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व होते. पुरुषांमध्ये इथिओपियाच्या तेसफाये अबीराने k09पदार्पणातच अव्वल स्थानी कब्जा केला़, तर देरजी देबेलेने द्वितीय आणि केनियाच्या ल्युक किबेटने तृतीय स्थान पटकावले. महिलांमध्ये तिन्ही स्थानांवर इथिओपियाने नाव कोरले. गतविजेत्या दिनकेश मेकाशने अव्वल स्थान पटकावले. तिने २ तास व ३० मिनिटांत शर्यत पूर्ण केली. तर कुमेशी सिचलाने दुसरे आणि मार्टा मेगराने तिसरे स्थान पटकावले.

‘सावरपाडा एक्स्प्रेस’ सुसाट
कविता राऊतने अर्धमॅरेथॉन शर्यत १ तास, १९ मिनिटे आणि ५० सेकंदांत पूर्ण करत अव्वल स्थान राk08खले. हा गट खुला करण्यात आल्याने ग्रेट ब्रिटनच्या इव्ह बगलेरने द्वितीय, तर उरणच्या सुप्रिया पाटीलने तृतीय स्थान मिळवले. केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सराव म्हणून कविता सहभागी झाली होती. मात्र तिला आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवता आली नाही. दरम्यान, कामानिमित्ताने भारतात येणाऱ्या बगलेरची कामगिरी कौतुकास्पद होती. मात्र पत्रकार परिषदेला तिची अनुपस्थिती खटकणारी होती. पुरुषांमध्ये इंद्रजीत पटेलने अव्वल, तर अटवा भगतने द्वितीय, तर गोविंद सिंगने तृतीय स्थान पटकावले.k16

बॅग हरवल्याने खोळंबा!
शर्यत संपल्यानंतर कविताला ट्रॅकसूटचा पोशाख परिधान करायचा होता. मात्र तिच्या कपडय़ाची बॅग संयोजकांच्या गोंधळात हरवली. सरावासाठी चिपळूणला रवाना होण्यासाठी कविताला सकाळी ११ वाजताची ट्रेन पकडायची होती. दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर बॅग अवतरली. प्रसारमाध्यमांशी जेमतेम संवाद साधत कविता चिपळूणला रवाना झाली.
 
विजयरेषेवरून उष्णतेमुळे धावपटूंची माघार
आफ्रिका खंडातील शर्यतपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये नेहमीच वर्चस्व गाजवतात. मात्र उष्ण वातावरण व पोटाच्या विकारामुळे k07केनियाच्या धावपटूंना शर्यत अर्धवट सोडावी लागली. २०१२मध्ये मॅरेथॉनच्या अव्वल स्थानासह लंडन ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित करणारा रामसिंग यादवही पोटाच्या विकारामुळे यंदा शर्यत पूर्ण करू शकला नाही. भारतीय गटात अव्वल स्थानासाठी तो प्रबळ दावेदार होता.

मॅरेथॉन सहभागावर मर्यादा
वर्षांत किती मॅरेथॉनमध्ये शर्यतपटू सहभागी होऊ शकतात या संदर्भात भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ र्निबध आणण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास प्रत्येक शर्यतपटूला महासंघाने परवानगी दिलेल्या मॅरेथॉनमध्येच सहभागी होता येईल. मॅरेथॉनच्या बक्षीस रकमेचा प्रशिक्षण, प्रवास खर्चासाठी विनियोग करणाऱ्या शर्यतपटूंसाठी हे र्निबध जाचक ठरू शकतात.
बॉम्बची अफवा..
देशातील संवेदनशील पाश्र्वभूमीवर मुंबई मॅरेथॉनसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास सीएसटी परिसरात पोलिसांना एक काळी बॅग सापडलीk06. या बॅगचा मालक समोर न आल्याने संशय निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तो छोटा रस्ता येण्या-जाण्यासाठी बंद केला. तातडीने बॉम्बशोध पथकाने ती बॅग बॉम्ब नसल्याचे स्पष्ट केले. श्वानपथकानेही बॉम्ब नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर पोलिसांनी ती बॅग उघडली आणि त्यात मॅरेथॉनचे किट सापडताच सगळ्यांनी हुश्श करत निश्वास सोडला.
एक शर्यतपटू अतिदक्षता विभागात
पूर्ण मॅरेथॉन शर्यतीत पळणारे किरीट गनात्रा यांच्यावर दुसरा धावपटू आदळल्याने त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, थकवा, चक्कर अशा कारणांसाठी १४ शर्यतपटूंना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र यापैकी बहुतांशींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
शर्यत लवकर सुरू करण्याची मागणी
शर्यतीत पहिल्या सत्रात थंड वातावरण लाभते, मात्र नंतर उन्हाचे चटके बसू लागतात आणि पळण्यावर परिणाम होतो. ७ वाजून २० मिनिटांनी सुरू होणारी शर्यत किमान अर्धा तास आधी सुरू व्हावी, अशी आग्रही मागणी पूर्ण मॅरेथॉनच्या विविध गटांतील शर्यतपटूंनी केली.

(सर्व छायाचित्रे : केव्हिन डिसुझा, प्रदीप कोचरेकर, दिलीप कागडा, गणेश शिर्सेकर, वसंत प्रभू, प्रदीप दास)