मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र लंगडी असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या मुंबई महापौर चषक स्पर्धेत दोन्ही गटांमधील विजेतेपदासाठी श्री समर्थ व्यायाम मंदिर आणि अमरिहद मंडळ यांच्यात सामना रंगणार आहे. पुरुषांमध्ये श्री समर्थने धामणगाव महापालिका शाळेचा व अमरिहदने विजय क्लबचा तर महिला गटात श्री समर्थने श्री गणेश स्पो. क्लबचा व अमरिहदने धामणगाव महापालिका शाळेचा पराभव केला.

महिलांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्री समर्थने श्री गणेश स्पो. क्लबचा १५-६ असा तब्बल एक डाव व ९ गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्री समर्थच्या सिद्धी हरमळकर, मधुरा पालव व तृष्णा उंबरकर यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला तर श्री गणेशच्या रेश्मा पोटले व अर्चना मेणे यांनी चांगली लढत दिली. तसेच अमरिहद मंडळाने धामणगाव महापालिका शाळेवर १३-११ असा एक डाव व २ गुणांनी विजय संपादन केला. यात अमरिहदच्या मधुरा पेडणेकर, संजना कुडव व प्रीती सुर्वे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले तर धामणगाव महापालिकेच्या कल्याणी घोगरा व राजश्री माळी यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला.

पुरुषांच्या उपांत्य फेरीत श्री समर्थने धामणगाव महापालिका शाळेवर २५-२२ असा ३ गुणांनी निसटता विजय संपादन केला. या सामन्यात श्री समर्थच्या दीपेश गडेकर, हितेश आंग्रे व मिहिर वास्ते यांनी तर धामणगाव महापालिकेच्या सुदर्शन पाटील, रामदास तारे व साहिल केणे यांनी सामन्यात रंगत आणताना श्री समर्थला जोरदार लढत दिली. दुसऱ्या सामन्यात अमरिहदने पारंपरिक प्रतिस्पर्धी विजय क्लबचा २६-२१ असा एक डाव व ५ गुणांनी धुव्वा उडवत आपणच विजेतेपदाचे दावेदार असल्याचे सिद्ध केले. अमरिहदच्या किरण कर्णवार, विरव पाटील, प्रसाद भाटकर यांनी तर विजयच्या प्रदीप फळसमकर, आदेश पाडावे व नितीन पाष्टे यांनी दर्जेदार लंगडी खेळाचे प्रदर्शन केले.