कबड्डी या खेळात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. नैसर्गिक खेळापेक्षा बुद्धिचातुर्याचा खेळ सरस ठरतो. शिवशक्ती विरुद्ध डॉ. शिरोडकर या महिलांच्या कबड्डीमधील दोन सर्वोत्तम संघांमधील सामन्यामध्ये नेमकी हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. त्यामुळे शिरोडकर संघाला जेतेपद गमवावे लागले. शिवशक्ती संघाने २२-१९ अशा फरकाने रुबाबात विजेतेपदाला गवसणी घातली आणि मुंबई महापौर चषक सलग दुसऱ्यांदा जिंकला. तथापि, प्रारंभी संथ आणि उत्तरार्धात धसमुसळ्या कबड्डीचा आविष्कार घडविणाऱ्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारत पेट्रोलियमने एअर इंडियाला १६-१५ असे चकवून सलग सहाव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. गोरेगाव येथील संघर्ष मंडळाच्या पटांगणावर मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेतील महिलांच्या अंतिम सामन्यात पाच मिनिटे शिल्लक असताना तेव्हा शिरोडकर संघाकडे १८-१० अशी आघाडी होती. परंतु शिवशक्तीच्या जिगरबाज संघाने हार मानली नाही. शेवटच्या पाच मिनिटांत शिवशक्तीने आपल्या खेळाचा अनपेक्षितपणे उंचावला आणि बेसावध राहणाऱ्या शिरोडकर संघाला हे आव्हान पेलवले नाही. रेखा सावंतने एकाच चढाईत तीन गुण घेतल्यामुळे शिरोडकर संघावर लोण चढला. याच काळात सोनाली शिंगोटेने शिरोडकरची आंतरराष्ट्रीय कीर्तीची खेळाडू स्नेहल साळुंखेची दुसऱ्यांदा सारख्याच पद्धतीने पकड केली आणि संघाला १८-१८ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर सुजाता कालगांवकर क्षेत्ररक्षण करताना बाद झाली. मग क्षितिजा हिरवेची पकड करीत शिवशक्तीने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुवर्णा बारटक्केने सोनाली शिंगोटे आणि रेखा सावंत यांसारख्या नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करीत हा विजयाचा अध्याय रचला.
पुरुषांचा अंतिम सामना पहिल्या सत्रात अतिशय संथ ठरला. भारत पेट्रोलियमने मध्यंतराला ६-५ अशी आघाडी घेतली होती. सामन्याची ५ मिनिटे शिल्लक असताना भारत पेट्रोलियमकडे १४-१० अशी आघाडी होती. त्यानंतरच सामन्याची खरी चुरस पाहायला मिळाली. एअर इंडियाच्या पवन कुमारने आक्रमक चढाया करीत ही आघाडी एका गुणाच्या फरकापर्यंत कमी केली. परंतु वेळेचे गणित जुळवता न आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी संघाकडून आशीष म्हात्रे, नीलेश शिंदे आणि शैलेश सावंत यांनी दिमाखदार खेळ केला, तर एअर इंडियाकडून सचिन पाटील आणि पवन कुमार यांनी कडवी झुंज दिली. शैलेश सावंत (भारत पेट्रोलियम) आणि  रेखा सावंत (शिवशक्ती) स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
पवन कुमार (एअर इंडिया) व स्नेहल साळुंखे (शिरोडकर) यांना सर्वोत्तम चढाईपटूचे बक्षीस देण्यात आले, तर सर्वोत्तम पकडपटू म्हणून आशीष म्हात्रे (भारत पेट्रोलियम) आणि सुजाता काळगांवकर (शिरोडकर) यांना गौरवण्यात आले.