News Flash

मुंबई विजयाच्या दिशेने

१ बाद २ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मुंबईला पहिल्या षटकात झटका बसला.

अचूक गोलंदाजी करून मुंबईच्या धावगतीवर अंकुश बसवणारा जयंत यादव 

अखेरच्या दिवशी ९ बळींची गरज; शेष भारत १ बाद १००

रणजी करंडक स्पध्रेतील मक्तेदारी सिद्ध करणाऱ्या मुंबई संघाने इराणी चषक स्पध्रेचे जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली आहे. मुंबईचा दुसरा डाव १८२ धावांवर गडगडला असला तरी त्यांनी शेष भारतासमोर विजयासाठी ४८० धावांचा डोंगर उभा केला आहे. प्रत्युत्तरात शेष भारताने दिवसअखेर १ बाद १०० धावा केल्या आहेत. अखेरच्या दिवशी मुंबईला विजयासाठी नऊ बळींची, तर शेष भारताला ३८० धावांची गरज आहे. सुदीप चॅटर्जी (१७) आणि सलामीवीर फैझ फजल (४१) खेळत आहेत.

१ बाद २ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मुंबईला पहिल्या षटकात झटका बसला. श्रेयस अय्यरला भोपाळाही फोडू न देता जयदेव उनाडकटने माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या यादवने सातत्यपूर्ण खेळ करताना बिस्तासह मुंबईला सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. यादव व बिस्ता यांची ३९ धावांची भागीदारी उनाडकटनेच तोडली. बिस्ताने ३० चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावा केल्या. कर्णधार आदित्य तरेही स्वस्तात बाद झाला.

यादवने पाचव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या सिद्धेश लाडसह संघर्ष सुरूच ठेवला. दोघांची ५४ धावांची भागीदारी जयंत यादवने संपुष्टात आणली. यादवचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्यानंतर अभिषेक नायर, धवल कुलकर्णी, बलविंदर सिंग संधू (कनिष्ठ) झटपट बाद झाले. लाडने संयमी खेळ करत अर्धशतक पूर्ण केले. १०९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ६० धावा करणाऱ्या लाडला जयंत यादवने तंबूत पाठवले. पहिल्या डावातील २९७ धावांच्या आघाडीत मुंबईला दुसऱ्या डावात अवघ्या १८२ धावांचीच भर घालण्यात यश आले.

विजयासाठी ४८० धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या शेष भारताने पहिल्या डावातील चुका टाळताना मुंबईच्या गोलंदाजांचा संयमाने सामना केला. तरी ७३ चेंडूंत ४ चौकारांसह ४२ धावांची खेळी करणाऱ्या श्रीकर भारतला इक्बाल अब्दुल्लाने त्रिफळाचीत करून घरचा रस्ता दाखवला. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शेष भारताच्या १ बाद १०० धावा झाल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : पहिला डाव ६०३; शेष भारत : पहिला डाव ३०६

मुंबई : दुसरा डाव १८२ (जय बिस्ता ३८, सूर्यकुमार यादव ४९, सिद्धेश लाड ६०; जयंत यादव ४-९३, जयदेव उनाडकट ३-१६, स्टुअर्ट बिन्नी २-४१, कृष्णा दास १-२५); शेष भारत : दुसरा डाव १ बाद १०० (फैझ फजल खेळत आहे ४१, श्रीकर भारत ४२, सुदीप चॅटर्जी खेळत आहे १७; इक्बाल अब्दुल्ला १-१९).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 4:09 am

Web Title: mumbai on way to win in ranji irani trophy competition
Next Stories
1 माद्रिद उपांत्यपूर्व फेरीत
2 ज्वाला-अश्विनीला पराभवाचा धक्का
3 नेयमारचे प्राधान्य ऑलिम्पिक -डुंगा
Just Now!
X