समुद्राची साथ क्षितिजाला कवेत घेण्याचे बळ देते. अथांगतेचा वसा जपणाऱ्या समुद्राशी मुंबईतल्या मच्छिमार बांधवांचं सख्य. कुलाबा परिसरात मासेमारी करणाऱ्या मदन राठोड यांच्या मुलाने मात्र फुटबॉल खेळण्याचे स्वप्न जोपासले. उपजत कौशल्याला समर्थ हातांचे कोंदण लाभल्याने कुमारला फुटबॉलच्या प्रगत प्रशिक्षणासाठी जर्मनीला जाण्याची संधी मिळाली आहे. यू ड्रीम फुटबॉल उपक्रमातून भारतातील १५ मुलांना जर्मनीतील टीएसजी १८९९ हॉफेन्हेम क्लबकडून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या चमूचा कुमार महत्त्वाचा शिलेदार आहे.
मायानगरीत दाखल झालेल्या मदन राठोड हे परिस्थितीशी संघर्ष करतच मुंबईतच स्थिरस्थावर झाले. आपल्या मुलांनी यशशिखर पादाक्रांत करावे, हे त्यांचे स्वप्न आज धाकटा मुलगा कुमारच्या रुपाने पूर्ण होताना दिसत आहेत. ‘‘पुढील सहा वर्ष कुमार जर्मनीत फुटबॉल प्रशिक्षणासाठी जाणार आहे, यावर अजूनही विश्वास बसत नाही,’’ अशी प्रतिक्रिया मदन यांनी दिली. ‘‘कर्नाटकातून येथे आलो तेव्हा मी कुमारच्याच वयाचा असेन, कोणताही आगापिछा नसताना मुंबईने इतरांप्रमाणे मलाही सांभाळले. मच्छिमाराच्या व्यवसायातून मूलभूत गरजा भागतील इतका पैसा कमवू लागलो. लग्न झालं. मुलं झाली.. माझ्या मुलांनी मोठी झेप घ्यावी असे मनोमन वाटायचे. कुमारच्या या भरारीने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वयाच्या पाचव्या वर्षांपासून फुटबॉल खेळणारा कुमार थोरल्या भावाला पाहून प्रगती करत गेला. मात्र, घरच्या जबाबदारीमुळे थोरल्या भावाला अध्र्यावरच फुटबॉल सोडावे लागले. वडिलांचे आणि भावाचे स्वप्न कुमारने आपले समजून फुटबॉलमध्य प्रगती करत गेला. जिल्हा क्रीडा स्पर्धा, मुंबई शालेय क्रीडा स्पर्धा आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या स्पर्धामधून कुमारने स्वत:चे कौशल्य दाखवले. पण, त्याला गरज होती ती योग्य व्यासपीठाची.
यू ड्रीमच्या उपक्रमाने त्याला ती संधी दिली आणि आज त्याची निवड जर्मनीत प्रशिक्षणासाठी झाली आहे. कुमार म्हणतो, ‘‘हा आनंद शब्दातीत आहे. तो माझ्या वडिलांच्या आणि भावाच्या डोळ्यात तुम्हाला दिसेल. मिळालेल्या संधीचे सोनं करून भारताचे प्रतिनिधीत्व करायचे आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो माझा आवडता खेळाडू आहे. संपूर्ण जग त्याला ओळखते, तशीच माझीही ओळख निर्माण व्हावी हे स्वप्न आहे’’

१५ खेळाडूंना संधी
यू ड्रीम हरयाणा फुटबॉल क्लबतर्फे आणि हरयाणा फुटबॉल असोसिएशन आणि हरयाणा ऑलिम्पिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने देशातून १५ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये प्रणव कानसे, अंनिकेत वेरेकर  (कोल्हापूर), आकाश मिश्रा (लखनऊ), प्रदीप मन्न्ोवार (उदयपूर), शिवम मान (नवी दिल्ली), कुमार राठोड,इशांत राणा, राऊल लुइस (मुंबई), आयुष अधिकारी (नॉयडा), अंकित भुयान (भुवनेश्वर), अरमान कालरा (गुरगाव), डेल्टन कोलॅको, किरमान फर्नाडिस, वेलिस्टर मेंडीस (गोवा), मनिश मल्याद्री सिधा (पुणे) यांचा समावेश आहे.  भारताचा माजी कर्णधार महेश गवळी आणि जॉन केनेथे राज हे प्रशिक्षक सोबत असणार आहेत.