‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी सध्या अटकेत असलेला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू श्रीशांतविरुद्ध मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभागही गुन्हा दाखल करून दिल्ली पोलिसांकडून त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त हिमांशु रॉय यांनी यासंदर्भात ही माहिती दिली.
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधील श्रीशांतच्या खोलीतून शुक्रवारी रात्री त्याचा लॅपटॉप, आयपॅड, मोबाइल, ७२ हजार रुपये आणि इंग्लिश व मल्याळम् भाषेत लिहिलेली (श्रीशांतच्या हस्ताक्षरातील) डायरी असा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्याची शहानिशा सुरू असून त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का याचा शोध घेण्यात येत आहे. श्रीशांतविरुद्ध मुंबईतही गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा करण्याकरिता संबंधित न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली आहे, असेही रॉय यांनी सांगितले. श्रीशांतचा जवळचा मित्र त्याच्यावतीने सट्टेबाजांच्या सतत संपर्कात होता. हॉटेलमधील श्रीशांतच्या खोलीतून वस्तू जप्त करण्यात आल्या, त्यावेळी तो तेथेच उपस्थित होता.
श्रीशांत आणि अन्य दोन खेळाडूंना ‘स्पॉट-फिक्िंसग’ प्रकरणी अटक करण्यापूर्वी एक दिवस आधी आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या तिघांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यानंतर गुरुवारीही त्यांच्या आणखी एक साथीदाराला अटक करण्यात आली. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. श्रीशांतच्या खोलीत सापडलेला लॅपटॉप आणि मोबाइलमधून काही पुरावा हाती लागल्यास याप्रकरणी त्याला अटक करण्याची शक्यता रॉय यांनी वर्तवली. वांद्रे येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये श्रीशांतने एकटय़ासाठीच खोली घेतली होती. त्याच्या संघातील अन्य खेळाडू दुसऱ्या हॉटेलमध्ये उतरले होते. हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून १३ ते १५ मे या कालावधीत त्याच्या खोलीमध्ये त्याला भेटायला आलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात असल्याचे रॉय यांनी सांगितले.