17 December 2017

News Flash

ये रे माझ्या मागल्या..

* मुंबईने पहिल्याच दिवशी सोडले तब्बल पाच झेल * सुदैवी मनदीप सिंगचे नाबाद शतक; पंजाब

प्रसाद लाड , मुंबई | Updated: December 9, 2012 1:19 AM

* मुंबईने पहिल्याच दिवशी सोडले तब्बल पाच झेल
* सुदैवी मनदीप सिंगचे नाबाद शतक; पंजाब ४/२८८
बंगालविरुद्धच्या गेल्याच सामन्यात एक झेल विजय आणि पराजयामधील अंतर ठरवू शकतो, याची प्रचीती मुंबईच्या संघाला आली असली तरी त्यामधून कोणताही बोध त्यांनी घेतलेला नाही, हे स्पष्टपणे पंजाबविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी निदर्शनास आले. नाणेफेक जिंकून मुंबईने पंजाबला फलंदाजीला आमंत्रित केले खरे, गोलंदाजांनी त्यांच्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी केलीही, पण तब्बल पाच झेल सोडत मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी पुन्हा एकदा ‘कॅचेस विन्स द मॅचेस’ ही म्हण माहिती नसल्याचे दाखवून देत, ‘ये रे माझ्या मागल्या..’ या म्हणीचा प्रत्यय आणून दिला. तीनदा सुदैवी ठरलेल्या मनदीप सिंगने या जीवदानांचा पुरेपूर फायदा घेत नाबाद शतक झळकावले आणि दिवसअखेर संघाला ४ बाद २८८ अशी मजल मारून दिली.
गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर पंजाबने सावध सुरुवात केली, पण १६ व्या षटकांत कर्णधार अजित आगरकरने करण गोयलला (२५) बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर फार्मात असलेल्या जीवनज्योत सिंगला (४२) बाद करण्याच्या दोन संधी चालून आल्या होत्या, पण त्या मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनी सोडल्या. जीवनज्योत ३९ धावांवर असताना अभिषेक नायरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक आदित्य तरेने त्याचा झेल सोडला, त्यानंतर जीवनज्योत ४१ धावांवर असताना अंकित चव्हाणच्या पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने त्याचा झेल सोडला. या दोन्ही जीवदानांचा त्याला फायदा उचलता मात्र आला नाही. मुंबई या चुकांमधून सहीसलामत बाहेर सुटली खरी, पण त्यामधून काहीच शिकली नाही. त्यानंतर नाबाद शतकवीर मनदीपला तब्बल तीन जीवनदानं मुंबईने दिली. आगरकरच्या गोलंदाजीवर मनदीप ६७ धावांवर असताना अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये त्याचा झेल सोडला, त्यांतर मनदीप ७४ धावांवर असताना अजिंक्यनेच बलविंदर सिंगच्या (कनिष्ठ) गोलंदाजीवर पुन्हा जीवदान दिले. तर मनदीप ९३ धावांवर असताना रोहितने पुन्हा अंकितच्या गोलंदाजीवर त्याचा झेल सोडला. संक्षिप्त धावफलक पंजाब (पहिला डाव) : ८९.४ षटकांत ४ बाद २८८ (मनदीप सिंग खेळत आहे १०२, रवी इंदर सिंग ७६; अजित आगरकर २/५४, धवल कुलकर्णी २/६१).   

First Published on December 9, 2012 1:19 am

Web Title: mumbai poor performance in fielding on first day