सूर्यकुमार यादव-श्रेयस अय्यरची आक्रमक फलंदाजी आणि धवल कुलकर्णीने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. मुंबईने दिलेलं 156 धावांचं आव्हान पंजाबचा संघ पूर्ण करु शकला नाही, पंजाब 120 धावांपर्यंतच मजल मारु शकला. पहिल्या सामन्यात मुंबईने सिक्कीमचा पराभव केला होता.

पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईचे सलामीवीर पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरले. पृथ्वी 8 धावांवर तर अजिंक्य भोपळाही न फोडता माघारी परतला. मात्र यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरला. अय्यरने 46 तर सूर्यकुमारने 80 धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे मुंबईच्या संघाने आश्वासक धावसंख्या गाठली.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवातही खराब झाली. शुभमन गिल अवघी 1 धाव काढून माघारी परतला. पंजाबचा दुसरा सलामीवीर प्रब सिमरन सिंहने मुंबईच्या गोलंदाजीचा सामना करत अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने पंजाबचा एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजासमोर तग धरु शकला नाही. धवल कुलकर्णीने पंजाबच्या 4 फलंदाजांना माघारी धाडलं. अखेर 120 धावांवर पंजाबचा सर्व संघ बाद करत मुंबईने 35 धावांनी विजय मिळवला.