पी. व्ही. सिंधू, ली ह्य़ुन यांसारख्या मातबर खेळाडूंचा संघात समावेश असूनही गतविजेत्या हैदराबाद हंटर्सला शनिवारी प्रीमिअर बॅडमिंटन लीगमध्ये मुंबई रॉकेट्सकडून ४-२ असा पराभव पत्करावा लागला. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईसमोर गतउपविजेत्या बेंगळूरु रॅप्टर्सचे आव्हान असणार आहे.

बेंगळूरुच्या कांतीरवा बंदिस्त स्टेडियमवर रंगलेल्या या उपांत्य सामन्यात हैदराबादचे पारडे जड मानले जात होते. मात्र पुरुष दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात मुंबईच्या किम जी जंग व ली याँग डे यांनी हैदराबादच्या बोडिन इसरा व किम सा रंगला १५-१४, १५-१२ असे रोमहर्षक लढतीत पराभूत केले. त्यानंतर पुरुष एकेरीतील पहिल्या लढतीत भारताच्या समीर वर्मानेदेखील नेदरलँड्सच्या मार्क काल्जोला १५-८, १५-७ अशी धूळ चारली.

महिला एकेरीत हैदराबादच्या सिंधूने श्रियांशी परदेशीला १५-६, १५-५ असा धुव्वा उडवला. दुसऱ्या पुरुष एकेरीत मुंबई रॉकेट्सच्या आंद्रेस अँटोसनने ली ह्य़ुनवर १५-१३, १५-६ अशी सरशी साधून मुंबईच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.