खेळ आणि खेळाडूंचा विकास करणे हे संघटकांवर अवलंबून असते. मुंबई शहर तालीम संघाचे संघटक अथक परिश्रम घेत खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत, पण सध्या त्यांच्यावरच रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. २०१२ साली मुंबई शहर तालीम संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली आणि त्यांनी शारीरिक शिक्षण मंडळाकडे कार्यालयाच्या वास्तूच्या जागेवर ताबा देण्याबाबत पत्र दिले. परंतु शारीरिक शिक्षण मंडळ आडमुठे धोरण राबवीत असून, गेल्या वर्षभरात तालीम संघाला कार्यालयाचा ताबा दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
‘कुस्तीमधील देवमाणूस’ अशी बिरुदावली बाबूराव शेटे यांना कुस्तीप्रेमींनी दिली होती. त्यांनीच वडाळा येथील भारतीय क्रीडामंदिरातील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळामध्ये तालीम संघाला कार्यालय मिळवून दिले होते. पण या संघटनेचे माजी अध्यक्ष असलेले बाबूराव यांचे पुत्र संजय शेटे शारीरिक शिक्षण मंडळाच्या प्रमुख कार्यवाहपदी असून त्यांच्याच आडमुठय़ा धोरणांमुळे तालीम संघाला कार्यालयाची जागा मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
१९६९ साली मुंबई शहर तालीम संघाची स्थापना करण्यात आली आणि १९७० साली ९९ वर्षांच्या नाममात्र भाडेतत्त्वावर त्यांना शारीरिक शिक्षण मंडळाने कार्यालयासाठी जागा दिली. संजय शेटे हे काही वर्षांपूर्वी तालीम संघाच्या उपाध्यक्षपदावर होते, त्यांच्याकडून खेळाचा आणि खेळाडूंचा विकास होईल, यासाठी त्यांना संघटनेच्या कार्याध्यक्षपदावर निवडण्यात आले. पण त्यांच्या कार्यकालात कुस्तीला अपेक्षेनुसार चांगले दिवस न आल्याने त्यांना या पदावरून पायउतार करण्यात आले आणि १९ मार्च २०१२ साली तालीम संघाची निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर २१ मार्च २०१२ रोजी तालीम संघाने संजय शेटे यांना कार्यालयाचा ताबा देण्याबाबत पत्रव्यवहार केला, त्यानंतर २९ मार्च रोजी पुन्हा एकदा तालीम संघाने कार्यालयाचा ताबा देण्याबाबत पत्रव्यवहार केला, पण शारीरिक शिक्षण मंडळाने त्यांना जागा दिलीच नाही. याविरोधात तालीम संघाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी, क्रीडा अधिकारी एन. बी. मोटे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले, पण त्यांना अजूनही यश आलेले नाही. खेळासाठी वचनबद्ध असलेल्यांच्या कार्यालयावर खेटे मारून तालीम संघाने जोडे झिजवले असले, तरी त्यांना त्यांचा हक्क अजूनही मिळालेला नाही. मुंबई शहर तालीम संघाच्या अध्यक्षपदी शरद पवार असतानादेखील त्यांना अजूनही झगडत राहावे लागत असून, कोणताही आशेचा किरण त्यांना दिसत नाही.
याबाबत मुंबई शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष शशिकांत देशमुख म्हणाले की, ‘‘गेल्या वर्षी निवडणुका झाल्यावर आम्ही संजय शेटे यांना कार्यालयाच्या जागेचा ताबा देण्याबाबत बरेच अर्ज केले, पण त्यांनी अजूनही आम्हाला जागेचा ताबा दिलेला नाही. वर्षभरापासून आम्ही बऱ्याच क्रीडाप्रेमी नेत्यांकडे याबाबतीत गेलो, पण अजूनही आम्हाला जागेच ताबा मिळालेला नाही. मुंबईतील कुस्तीची आणि कुस्तीपटूंची प्रगती व्हावी, हेच आमचे ध्येय आहे, त्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. पण कार्यालय नसल्याने आम्हाला काहीच करता येत नाही. आमची सर्व कागदपत्रेही कार्यालयाच्या कपाटांमध्ये आहेत. त्यामुळे जोपर्यंत कार्यालयाचा ताबा आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही.’’
शारीरिक शिक्षण मंडळ तालीम संघाला एकिकडे जागा देत नसून, दुसरीकडे शरद पवार यांचा उल्लेख असलेला कार्यालयाचा फलक त्यांनी पुसून टाकला असून, तिथे आपली पाटी लावली आहे. त्या कार्यालयाच्या बाहेर सुरक्षारक्षक बसवण्यात आले असून संघटकांना कार्यालयाजवळ फिरकूही दिले जात नाही. तालीम संघाची सर्व कागदपत्रे त्या कार्यालयात असून ही कागदपत्रेही त्यांना देण्यात आलेली नसल्याने स्पर्धा भरवताना त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे कार्यालयाचा ताबा न देता शारीरिक शिक्षण मंडळ त्यांच्याकडे संघटनेच्या नोंदणीचे आणि भाडेतत्त्वाचे पुरावे मागत असून तालीम संघाला रडवण्याचा डाव मुंबई शहर तालीम संघ खेळत आहे.
देशी खेळांचा विकास व्हावा, यासाठी शारीरिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. खाशाबा जाधव यांनी भारताला १९५२ साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकवून दिले ते कुस्तीमध्येच. त्याच कुस्तीची अवहेलना करण्याचे काम मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ करत आहे. राजकारण, आडमुठी धोरणे, हुकूमशाही याने कोणाचेच भले होणारे नाही. त्याने खेळ आणि खेळाडूंचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे शारीरिक शिक्षण मंडळाने आपली आडमुठी भूमिका बदलून कुस्तीच्या विकासास हातभार लावावा, अशीच कुस्तीप्रेमींची इच्छा आहे.

आम्ही तालीम संघाला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर जागा दिलेली नाही, त्यांना फक्त कार्यालयाचा पत्ता दाखवायचा होता, त्यामुळे आम्ही काही काळापुरती त्यांना जागा दिली होती. ही संस्था रजिस्टरदेखील नाही, तालीम संघाकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत. ही जागा मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचीच असून त्यावर तालीम संघ हक्क सांगू शकत नाही.
-संजय शेटे, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे प्रमुख कार्यवाह