तिसऱ्या दिवशीच सौराष्ट्रावर एक डाव आणि २१ धावांनी विजय; विक्रमी ४१व्या विजेतेपदाला गवसणी

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेवरील मुंबईचीच हुकमत पुन्हा एकदा सिद्ध झाली. सिद्धेश लाड व बलविंदरसिंग संधू यांच्या शतकी भागीदारीमुळे रचल्या गेलेल्या विजयाच्या पायानंतर त्यांच्या गोलंदाजांनी सौराष्ट्रच्या फलंदाजांची अवस्था बिकट केली. त्यामुळेच मुंबईला हा सामना एक डाव आणि २१ धावांनीजिंकता आला. मुंबईने विक्रमी ४१व्यांदा रणजी करंडकावर नाव कोरले.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबईचेच वर्चस्व होते. सिद्धेश लाडने धडाकेबाज ८८ धावा केल्या. तसेच बलविंदरसिंग संधूच्या (नाबाद ३४) साथीने १०३ धावांची भागीदारी रचली. हीच भागीदारी मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे मुंबईला १३६ धावांची आघाडी मिळाली. हीच आघाडी त्यांच्यासाठी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. शार्दूल ठाकूरने मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर त्यांनी सौराष्ट्रचा दुसरा डाव अवघ्या ११५ धावांत गुंडाळला. धवल कुलकर्णी व संधू यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला मोलाची साथ दिली.

सकाळच्या सत्रात जयदेव उनाडकटने दिवसाच्या पहिल्याच षटकात इक्बाल अब्दुल्लाला बाद करीत मुंबईला पहिला धक्का दिला. त्याच्या पुढच्याच षटकात लाडला २४ धावांवर जीवदान लाभले. त्या वेळी मुंबईची ९ बाद २७१ अशी स्थिती होती. या जीवदानानंतर लाडने मागे पाहिलेच नाही. त्याने चौकार व षटकारांची आतषबाजी करीत मैदान दणाणून सोडले. ११व्या क्रमांकावर खेळणाऱ्या बलविंदरसिंग संधूनेही आत्मविश्वासाने फटकेबाजी करीत त्याला चांगली साथ दिली. या जोडीने सौराष्ट्रची गोलंदाजी फोडून काढली. लाडने संधूच्या साथीने १५.२ षटकांत १०३ धावांची भागीदारी केली. उनाडकटनेच लाडला बाद करीत आक्रमक खेळाची ही मैफल संपवली. लाडने १९३ मिनिटांत १०१ चेंडूंमध्ये ८८ धावा केल्या. त्यामध्ये आठ चौकार व पाच षटकारांचा समावेश होता. संधूने सहा चौकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. मुंबईकडून शेवटच्या विकेटसाठी झालेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी १९६७-६८ मध्ये अशोक मंकड व सुशील संघवी यांनी ८७ धावांची भागीदारी केली होती. सौराष्ट्राकडून उनाडकटने चार, तर हार्दिक राठोडने तीन बळी घेतले.

पहिल्या डावात १३६ धावांनी पिछाडीवर असलेल्या सौराष्ट्रच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही खराब सुरुवात केली. मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत त्यांना चुका करण्यास भाग पाडले. उपाहारापूर्वीच त्यांनी अवी बारोट (४) व सागर जोगियानी (९) ही जोडी गमावली. बारोटला बाद करणाऱ्या संधूने अर्पित वासावडाला (३) बाद करीत सौराष्ट्रच्या फलंदाजीची बाजू आणखीनच कमकुवत केली. या धक्क्यातून सौराष्ट्र संघ सावरत नाही, तोच त्यांनी शेल्डन जॅक्सनला (१३) अभिषेक नायरने तंबूत धाडले. काही वेळा अतिसावध खेळही त्रासदायक ठरू शकतो. एका बाजूने बचावात्मक खेळ करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने कंटाळून आक्रमक खेळाला सुरुवात केली, मात्र शार्दूल ठाकूरच्या षटकात अनपेक्षितरीत्या उसळलेल्या चेंडूवर त्याने अखिल हेरवाडकरकडे झेल दिला. पुजाराने केवळ २७ धावा केल्या. त्यासाठी तो ९८ चेंडू खेळला. तो बाद झाला, त्यावेळी सौराष्ट्र संघ ३४.१ षटकांत ५ बाद ६७ असा अडचणीत सापडला होता. तेव्हाच मुंबईचा विजय स्पष्ट झाला होता. त्यांचे उर्वरित फलंदाज डावाचा पराभव टाळणार की नाही, हीच उत्सुकता बाकी होती. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेणारा सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव शहालाही पुन्हा अपयश आले. केवळ १७ धावांवर तो बाद झाला. पाठोपाठ सौराष्ट्रने प्रेरक मंकड (१) व चिराग जानी (११) यांच्याही विकेट्स गमावल्या. चहापानाला त्यांची ८ बाद ९७ अशी दयनीय स्थिती झाली होती. चहापानानंतर सौराष्ट्राच्या दीपक पुनिया व हार्दिक राठोड यांना बाद करीत ठाकूर याने मुंबईच्या विजेतेपदावर मोहोर नोंदवली. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा त्याचा हा दहावा पराक्रम आहे.

हे विजेतेपद साऱ्या मुंबईकरांचेच -तरे

‘‘आंध्र प्रदेशविरुद्धच्या साखळी सामन्यात आम्ही पहिल्या डावातील पिछाडीमुळे पराभव स्वीकारला. त्याच वेळी आम्ही विजेतेपदाच्या निर्धारानेच उर्वरित सामने खेळायचे ठरवले होते. हे स्वप्न साकार करण्यामध्ये संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सहयोगी प्रशिक्षक तसेच साऱ्या मुंबईकरांचा मोठा वाटा आहे,’’ असे मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने सांगितले.

‘‘सिद्धेश लाड व बलविंदरसिंग संधू यांनी सकाळच्या सत्रात केलेली शतकी भागीदारी आमच्यासाठी कलाटणी देणारी ठरली. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तेथूनच आम्ही पुन्हा सामन्यावर पकड मिळवली,’’ असे तरेने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘संघातील प्रत्येक खेळाडूने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी शंभर टक्के पार पाडली. शार्दूल ठाकूर, धवल व संधू यांनी प्रभावी गोलंदाजी केली. आमच्या क्षेत्ररक्षकांनीही त्यांना उत्तम साथ दिली. बुची बाबू चषक स्पर्धा जिंकल्यानंतर मला रणजी स्पर्धेचे विजेतेपद खुणावत होते. प्रत्येक सामन्यानंतर आम्ही सर्वोत्तम कामगिरी करीत राहिलो. संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी होते. मुंबई क्रिकेट असोसिएशन व निवड समिती यांनी दिलेले सहकार्यही महत्त्वाचे होते.’’

‘‘रणजी स्पर्धा ही राष्ट्ीय संघात स्थान मिळविण्याचे व्यासपीठ असते. या स्पर्धेत मी यष्टीमागे सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याचा फायदा मला भारतीय संघात कसोटी सामन्यांमध्ये स्थान मिळविण्यासाठी निश्चित होईल,’’ असेही तरेने सांगितले. तरेने या मोसमात यष्टीमागे ४८ बळी घेत विक्रमी कामगिरी केली. यापूर्वी श्रीकर भरतने ४६ बळी घेतले होते.

मुंबईच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षांव

रणजी करंडक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मुंबई संघाला दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याखेरीज मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांना दोन कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

धावफलक

सौराष्ट्र (पहिला डाव) : २३५

मुंबई (पहिला डाव) : ८२.२ षटकांत सर्वबाद  ३७१ (श्रेयस अय्यर ११७, सिद्धेश लाड ८८, सूर्यकुमार ४८;  जयदेव उनाडकट ४/११८, हार्दिक राठोड ३/७३)

सौराष्ट्र (दुसरा डाव) : ४८.२ षटकांत सर्व बाद ११५ (चेतेश्वर पुजारा २७, जयदेव शहा १७; शार्दुल ठाकूर ५/२६, धवल कुलकर्णी २/३४)

सामनावीर : श्रेयस अय्यर.

रणजी करंडक पुन्हा मुंबईकडे आणण्यात आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूने दिलेले योगदान मोलाचे ठरले. प्रशिक्षक या नात्याने मी दिलेल्या सूचनांचा या युवा संघाने योग्य रीतीने उपयोग केला. एक कुटुंब म्हणूनच आम्ही वावरत होतो. त्यामुळेच हे सोनेरी यश पाहू शकलो. लाड व संधू यांची शतकी भागीदारी महत्त्वाची ठरली. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी त्यांनी केलेली कामगिरी पुन्हा आम्हास सामन्यावर पकड मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरली. संघातील ११व्या खेळाडूपर्यंत फलंदाजी आहे, हेच येथे दिसून आले. सचिन तेंडुलकरने मुंबईत आमच्या खेळाडूंना केलेले मार्गदर्शनही खेळाडूंना प्रोत्साहन देणारे ठरले.

– चंद्रकांत पंडित,  प्रशिक्षक