महिला गटात पुणे विद्यापीठाची बाजी
राज्य शासनाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आयोजित केलेल्या १६व्या राज्य आंतर-विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पुरुष गटात मुंबई विद्यापीठाने राखले तर महिला गटाचे सर्वसाधारण विजेतेपद पुणे विद्यापीठाला प्राप्त झाले. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठांच्या खेळाडूंमध्ये चषक स्वीकारण्याची चढाओढ सुरू होती.
विविध क्रीडा प्रकारात पाहुण्यांच्या हस्ते मिळवलेल्या चषकांची रांग मुंबई व पुणे विद्यापीठाच्या खेळाडूंनी लावली. आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी जल्लोष करण्याबरोबरच प्रतिस्पर्धी विद्यापीठाला खिजवण्याचे काम ते करीत होते. संपूर्ण क्रीडा महोत्सवात पदक तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नागपूर विद्यापीठाचे सांघिक कौशल्य दिसून आले. यजमान नागपूर विद्यापीठाने महिलांच्या खो-खो आणि हँडबॉलमध्ये सुवर्णपदक पटकावले. हँडबॉल स्पर्धेत भुमेश्वरी भलावीच्या आक्रमक खेळामुळे नागपूर विद्यापीठाच्या पदरात सुवर्णपदक पडले. पुरुषांच्या खो-खो व महिलांच्या कबड्डीत शिवाजी विद्यापीठानेतर पुरुष व महिला बास्केटबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाला दुहेरी यश प्राप्त झाले. मात्र, बास्केट बॉल आणि कबड्डीचे चषक पाहुण्यांच्या हस्ते स्वीकारताना व्यासपीठावर खेळाडू नव्हते. कबड्डीचे खेळाडू जेवणासाठी गेल्याचे नंतर कळले तर बास्केटबॉलचे अर्धेच खेळाडू चषक घेण्यासाठी उपस्थित होते. पाच दिवस खेळल्यानंतर सर्वच विद्यापीठाच्या खेळाडूंना घरचे वेध लागले होते. त्यामुळे बक्षीस वितरण कार्यक्रमातील रटाळ भाषणांकडे लक्ष न देता त्यांची आपसात चुळबुळ सुरू होती.
विविध क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडूंना पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्यात पुरुष खेळांमध्ये हँडबॉलमध्ये सोलापूरचा रामेश्वर परचांडे आणि नागपूर विद्यापीठाचा भूषण वाईलवार, बास्केटबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाचा निखिल आणि नागपूर विद्यापीठाचा अनुप मस्के, खो-खोमध्ये शिवाजी विद्यापीठाचा युवराज जाधव आणि मुंबई विद्यापीठाचा हितेश, कबड्डीमध्ये मुंबई विद्यापीठाचा अभिषेक देसाई व पुणे विद्यापीठाचा मोबीन शेख, व्हॉलिबॉलमध्ये अमरावती विद्यापीठाचा अतुल बलेरिया आणि मुंबई विद्यापीठाचा जी.मोरे तर अथ्लेटिक्समध्ये मुंबई विद्यापीठाच्या सुरेश वाघ या खेळाडूंना गौरवण्यात आले.
महिलांच्या खेळ प्रकारांपैकी हँडबॉलमध्ये नागपूर विद्यापीठाची भूमेश्वरी भलावी व मुंबई विद्यापीठाची उज्ज्वला जाधव, बास्केटबॉलमध्ये मुंबई विद्यापीठाची रश्मी कुमार, नागपूर विद्यापीठाची आकांक्षा देशपांडे, खो-खोमध्ये नागपूर विद्यापीठाची सोनाक्षी मोकासे व पुणे विद्यापीठाची गौरी शेलार, कबड्डीमध्ये शिवाजी विद्यापीठाची मोनिका गजघाटे व पुणे विद्यापीठाची ईश्वरी कोंढालकर, व्हॉलिबॉलमध्ये पुणे विद्यापीठाची सायली करडेकर आणि अमरावती विद्यापीठाची रूतिका वानखेडे तर अथलेटिक्समध्ये नागपूर विद्यापीठाची पूजा पंडित व मुंबई विद्यापीठाची श्रद्धा घुले यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.