पहिल्या दिवशी ९ बाद २८६ अशी अवस्था

मुंबईच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करीत रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेत बडोद्याला पहिल्या दिवशी ९ बाद २८६ धावसंख्येपर्यंत सीमित ठेवले. बडोद्याकडून यष्टीरक्षक-फलंदाज पिनल शाहने झुंजार ६६ धावा केल्या.

भारतीय संघातून वगळण्यात आलेला अनुभवी फलंदाज युसूफ पठाणने २८ चेंडूंत ४१ धावा केल्या. त्याने आठ चौकार खेचले. मध्यमगती गोलंदाज तुषार देशपांडेने त्याला तंबूची वाट दाखवली. पठाणने या परिस्थितीत संयमाने खेळण्याची आवश्यकता होती, मात्र त्याने आक्रमणाचा मार्ग पत्करला.

पहिल्या सत्रात सलामीवीर आदित्य वाघमोडे (३९) आणि दीपक हुडा (४६) यांनी चांगली फलंदाजी केली. पालमच्या मॉडेल क्रीडा संकुलाच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मोठे फटके खेळणे कठीण जात होते.

डावखुरा फिरकी गोलंदाज विजय गोहिल (१६ षटकांत ७० धावांत ३ बळी) याच्यावर पठाणने जोरदार हल्ला चढवला. परंतु गोहिलने तीन बळी मिळवत आपली छाप पाडली. याचप्रमाणे वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने ७७ धावांत २ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

बडोदा (पहिला डाव) : ९ बाद २८६ (पिनल शाह ६६, दीपक हुडा ४६, युसूफ पठाण ४१; विजय गोहिल ३/७०, शार्दूल ठाकूर २/७७)