मुंबई आणि दिल्ली ही भारताच्या क्रिकेटमधील सर्वाधिक क्रिकेटपटू घडवणारी शहरे. त्यामुळे स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांचा रुबाब आणि वर्चस्व. शनिवारी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी हे दोन संघ अंतिम फेरीत झुंजणार आहेत. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडूंचा समावेश असल्यामुळे ही लढत रंगतदार होईल अशी अपेक्षा आहे. मात्र मागील दोन हंगामांमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या दिल्लीची हॅट्ट्रिक रोखण्याचे आव्हान मुंबईसमोर असेल.

चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांनी इथपर्यंतच्या वाटचालीत आपली ताकद अजमावली आहे. नवदीप सैनी आणि कुलवंत खेज्रोलिया या वेगवान गोलंदाजांवर दिल्लीची मदार आहे, तर अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासारख्या भारतीय संघाचा अनुभवी गाठीशी असणाऱ्या तारांकित फलंदाजांवर मुंबईची भिस्त आहे. उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात खेळणारा भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा अंतिम सामन्यासाठी मुंबईला अनुपलब्ध असेल. रविवारपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होत आहे.

मुंबईने हजारे करंडक दोनदा जिंकला आहे. यंदाची अंतिम फेरी गाठताना उपांत्यपूर्व फेरीत बिहारचा आणि उपांत्य फेरीत हैदराबादचा पराभव केला आहे.

कर्णधार अय्यरने फलंदाजीची आघाडी सांभाळत नेतृत्व करताना १२२च्या सरासरीने ३६६ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत लक्षणीय पर्दापण करणाऱ्या पृथ्वीने ८७च्या सरासरीने चार सामन्यांत ३४८ धावा केल्या आहे. उपांत्य सामन्यातसुद्धा त्याने वेगवान ६१ धावांची खेळी साकारली होती.

वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांनी महत्त्वाच्या क्षणी अप्रतिम गोलंदाजी करीत मुंबईला तारले आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज शाम्स मुलानीने चालू हंगामात मुंबईकडून सर्वाधिक १६ बळी मिळवले आहेत.

गंभीर, ध्रुव शौरी आणि नितीश राणा या फलंदाजांवर दिल्लीची मदार आहे. गंभीरसोबत सलामीला उतरणाऱ्या उन्मुक्त चंदला बाद फेरीत अपेक्षेला साजेसा खेळ दाखवता आलेला नाही; परंतु अंतिम फेरीचे दडपण झुगारत त्याने खेळ उंचावण्याची आवश्यकता आहे.

सैनी-खेज्रोलियाचा वेगवान मारा आणि पवन नेगीच्या झुंजार फलंदाजीच्या बळावर गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने गुरुवारी झारखंडला पराभूत केले. नवव्या क्रमांकावरील फलंदाज नेगी मैदानावर येण्यापूर्वी दिल्लीचा संघ पराभवाच्या छायेत होता. मात्र त्याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले.

  • सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २