News Flash

रेल्वेची गाडी रुळावर

रेल्वेचा पहिला डाव संपुष्टात आणणाऱ्या मुंबईला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त एकच बळी मिळवता आला.

सौरभ वाकस्कर, रेल्वे

सौरभ वाकस्करचे नाबाद दीडशतक * दिवसअखेर १ बाद २८५
पहिल्या दिवशी रेल्वेचा पहिला डाव संपुष्टात आणणाऱ्या मुंबईला सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त एकच बळी मिळवता आला. मुंबईने फिरकीच्या जोरावर बरेच सामने जिंकले असले तरी त्यांचा मंगळवारचा मारा बोथट आणि दिशाहीन आणि नावीन्याचा लवलेश नसलेला होता. रेल्वेचा सलामीवीर सौरभ वाकस्करने मुंबईच्या गोलंदाजांना झगडायला लावले. कारण तोच या दिवसाचा नायक ठरला. त्याने जवळपास संपूर्ण दिवस खेळून काढत नाबाद दीड शतक झळकावले आणि रेल्वेची गाडी रुळावर आणली. तिसऱ्या दिवसअखेर रेल्वेची १ बाद २८५ अशी स्थिती असून त्यांच्याकडे १७१ धावांची आघाडी आहे. त्यामुळे बुधवारी रेल्वेचा संघ कधी डाव घोषित करतो आणि मुंबई या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. वानखेडेची खेळपट्टी संथ होत चालली असून सामन्याच्या अखेरच्या दिवशी कर्ण शर्माच्या फिरकीवर साऱ्यांचीच नजर असेल.
दिवसाच्या दुसऱ्याच षटकात कर्ण शर्माने विशाल दाभोळकरचा बळी मिळवत मुंबईचा पहिला डाव संपुष्टात आणला. पहिल्या डावातला त्याचा हा सातवा बळी होता. या वेळी मुंबईला आपल्या धावसंख्येत फक्त एका धावेची भर घालता आली आणि पदार्पणात शतक करण्याचे निखिल पाटीलचे (नाबाद ८३) स्वप्न भंग पावले.
मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर आशीष सिंगचा सोपा झेल निखिल पाटीलने ‘स्लिप’मध्ये सोडला, त्या वेळी तो शून्यावर होता. त्यानंतर त्याने ४४ धावांची खेळी साकारत १०५ धावांची सलामी दिली. उपाहाराच्या काही मिनिटांपूर्वी त्याला विशालने पायचीत पकडले. पण तोपर्यंत सौरभने एका बाजूने खंबीरपणे आपले पाय रोवले होते. मुंबईच्या फिरकीपटूंनी त्याला बाद करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसले नाही. त्यांच्या चेंडूचा टप्पा आणि दिशा बळी मिळवण्यासाठी पूरक नव्हती. दिवसाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात मुंबईवर एकही बळी न मिळवण्याची नामुष्की ओढवली. त्याचबरोबर क्षेत्ररक्षणामध्येही आक्रमकता दिसली नाही. याचाच फायदा सौरभने उचलला आणि व्ही. चेलुवाराजला आपल्या साथीला घेतले. या दोघांनी मुंबईची फिरकी गोलंदाजी मोक्याच्या क्षणी कशी निष्प्रभ करता येऊ शकते, याचा उत्तम वस्तुपाठ दिला. फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडूला अधिक उंची देण्याचा विचार मुंबईच्या एकाही फिरकीपटूने केला नाही, हेच दुर्दैव. सौरभने उपाहारानंतर मोसमातील पहिले शतक लगावले. त्याच्या या खेळीमध्ये कुठलाही बडेजाव नव्हता. शांतपणे त्याने मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला. सौरभने खेळपट्टीवर जवळपास सहा तास खेळपट्टीवर ठाण मांडला. त्याने २६० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद १६१ धावांची खेळी साकारली. सौरभला चेलुवाराजने सुयोग्य साथ देत सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ७० धावांची खेळी साकारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची अभेद्य भागीदारी रचली.
संक्षिप्त धावफलक
रेल्वे (पहिला डाव) : २१७
मुंबई (पहिला डाव) : ९५.४ षटकांत सर्व बाद ३३१.
रेल्वे (दुसरा डाव) : ८५ षटकांत १ बाद २८५ (सौरभ वाकस्कर १६१*, व्ही. चेलुवाराज ७०*; विशाल दाभोळकर १/८१).

ही शतकी खेळी संघासाठी उपयुक्त ठरली, याचा आनंद आहे. मुंबईची फिरकी गोलंदाजी भेदक नक्कीच वाटली नाही, पण त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी चांगला मारा केला.
– सौरभ वाकस्कर, रेल्वे

आजचा दिवस मुंबईसाठी फारसा चांगला नव्हता. वेगवान गोलंदाजांनी चांगला मारा केला, पण फिरकीपटूंची दिशा चांगली नव्हती. अजूनही सामना आमच्या हातातून निसटलेला नाही. बुधवारी रेल्वेला झटपट गुंडाळण्याचा आमचा मानस आहे.
चंद्रकांत पंडित, मुंबईचे प्रशिक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 6:56 am

Web Title: mumbai vs railways ranji trophy 2015 16 group b at wankhede stadium
Next Stories
1 अनिर्णीत कसोटीत जॉन्सन चमकला
2 हाँगकाँग सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धा : दुखापतीमुळे सायनाची माघार
3 अथक मेहनतीमुळेच रहाणे उत्तम झेलपटू
Just Now!
X