माजी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने तामिळनाडूविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट लढतीत पहिल्या डावात ४ बाद १७१ अशी मजल मारली. तामिळनाडूच्या ३०५ धावांसमोर खेळताना मुंबईने नियमित अंतराने फलंदाज गमावले. मात्र सूर्यकुमारने चिवटपणे झुंज देत मुंबईचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा कर्णधार आदित्य तरे १९ तर श्रेयस अय्यर २४ धावांवर खेळत आहेत. मुंबईचा संघ अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी़, ६ बाद २६१वरून पुढे खेळणाऱ्या तामिळनाडूला संघाला ४४ धावांचीच भर घातली. ५० धावांची अर्धशतकी खेळी करून विजय शंकर बाद झाला. अश्विन ख्रिस्तने ३१ धावा केल्याने तामिळनाडूला तीनशेचा टप्पा ओलांडता आला.

मुंबईतर्फे शार्दूल ठाकूर आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पदार्पणवीर १७ वर्षीय पृथ्वी शॉ ४ धावा करून तंबूत परतला. उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला. प्रफुल्ल वाघेला आणि सूर्यकुमार यादव यांनी १२१ धावांची भागीदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार धावचीत झाला. त्याने ११ चौकार आणि एका षटकारासह ७३ धावांची खेळी साकारली. हैदराबादविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी साकारणाऱ्या सिद्धेश लाडला भोपळाही फोडता आला नाही. आदित्य तरे आणि श्रेयस अय्यर यांनी पाचव्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी करत पडझड थांबवली.

संक्षिप्त धावफलक

  • तामिळनाडू (पहिला डाव) : ३०५ (बाबा इंद्रजीत ६४, कौशिक गांधी ५०, विजय शंकर ५०; अभिषेक नायर ४/६६, शार्दूल ठाकूर ४/७५)
  • मुंबई (पहिला डाव) : ४ बाद १७१ (सूर्यकुमार यादव ७३, प्रफुल्ल वाघेला ४८; विजय शंकर १/१४)