इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

चेपॉक स्टेडियमवर आज रंगणाऱ्या ‘क्वालिफायर-१’मध्ये विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

बाद फेरीचे गणित कठीण असतानाही मुंबई इंडियन्सने लागोपाठ दोन सामने जिंकून थेट अग्रस्थानी झेप घेतली. आता तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई यांच्यात रंगणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असला तरी मुंबईचा झंझावात ते रोखू शकतील का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

साखळीतील दोन्ही सामन्यांत मुंबईने चेन्नईवर सहजपणे सरशी साधली होती. त्यामुळे या सामन्यातही विजय मिळवून थेट अंतिम फेरीत मजल मारण्याकडे मुंबईचे लक्ष लागले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने दमदार सुरुवात करत गुणतालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. त्यानंतर त्यांना दिल्ली कॅपिटल्सने मागे टाकले. अखेरच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवत चेन्नईकडून अग्रस्थान हिसकावून घेतले. आता बाद फेरीतील पहिल्या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएल सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मुंबईशी गाठ पडणार आहे.

एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नईने शानदार कामगिरी केली असून यंदाच्या मोसमात त्यांनी सातपैकी सहा लढती जिंकल्या आहेत. याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न चेन्नई संघ करणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची दुसरी संधी १० मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-२ सामन्याद्वारे मिळणार आहे.

चेन्नईच्या आघाडीच्या फळीने साखळी फेरीच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. मात्र जसप्रीत बुमरा (१७ बळी), लसिथ मलिंगा (१५ बळी), हार्दिक पंडय़ा (१४), कृणाल पंडय़ा (१०) आणि लेगस्पिनर राहुल चहल (१० बळी) या बलाढय़ मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला सामोरे जाताना त्यांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

कर्णधार धोनीने चेन्नईकडून सर्वाधिक ३६८ धावा (३ अर्धशतके) फटकावल्या असून त्याच्यावरच यजमानांच्या फलंदाजीची मुख्य भिस्त असणार आहे. शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस आणि सुरेश रैना यांच्यासह अंबाती रायुडूकडूनही चेन्नईला भरीव कामगिरीची अपेक्षा असेल. चेन्नईला मात्र अनुभवी केदार जाधवची उणीव भासणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात केदारचा खांदा दुखावल्यामुळे बाद फेरीतील त्याच्या समावेशाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. चेन्नईला आतापर्यंत गोलंदाजांनी तारले असून इम्रान ताहिरने त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा (प्रत्येकी १३ बळी) हेसुद्धा चेन्नईसाठी उपयुक्त योगदान देत आहेत.

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीची मदार कर्णधार रोहित शर्मा (३८६ धावा), क्विंटन डी’कॉक (४९२), हार्दिक पंडय़ा (३८०) आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर असणार आहे. मात्र चेपॉकच्या धिम्या गतीच्या खेळपट्टीवर चेन्नईच्या अनुभवी फिरकी त्रिकुटाचा सामना करताना मुंबईच्या अव्वल फलंदाजांना सावध खेळी करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी चेन्नईला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे म्हटले आहे.

मुंबई आणि चेन्नईने प्रत्येकी तीन वेळा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. मुंबईने २०१३, २०१५ व २०१७ मध्ये तर चेन्नईने २०१०, २०११ व २०१८ मध्ये विजेतेपदाची किमया साधली आहे.

१५ मुंबई आणि चेन्नई यांच्यात आतापर्यंत २६ लढती झाल्या असून मुंबईने १५ सामन्यांत तर चेन्नईने ११ सामन्यांत बाजी मारली आहे. मुंबईने यंदाच्या मोसमात चेन्नईविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्या आहेत.

संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, बेन कटिंग, क्विंटन डी’कॉक, बुरान हेंड्रिक्स, इशान किशन, पंकज जैस्वाल, सिद्धेश लाड, इविन लुइस, मिचेल मॅकक्लेनाघन, लसिथ मलिंगा, मयांक मरकडे, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, किरॉन पोलार्ड, रसिख सलाम, अनुकूल रॉय, बरिंदर स्रा, आदित्य तरे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), के. एम. आसिफ, सॅम बिलिंग्ज, चैतन्य बिश्णोई, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, फॅफ डय़ू प्लेसिस, रुतुराज गायकवाड, हरभजन सिंग, इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, स्कॉट कुगेलिन, मोनू कुमार, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मिचेल सान्तनेर, कर्ण शर्मा, मोहित शर्मा, ध्रुव शोरे, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, शेन वॉटसन, डेव्हिड विली.

सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा. 

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

बाद फेरीच्या लढती

क्वालिफायर-१

७ मे, मंगळवार

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

स्थळ : एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

एलिमिनेटर

८ मे, बुधवार

दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद

स्थळ : आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, विशाखापट्टणम