पाचव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पध्रेतील ‘ड’ गटाच्या लढतीत मुंबईने मध्यंतरालाच ७ गोल्सचा पाऊस पाडून केरळच्या आव्हानाची हवाच काढली आणि ११-० अशा विजयाची नोंद करत केरळचा धुव्वा उडवून आगेकूच केली. नवनीत कौरने पाच गोल करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला, तर पिंकी ठोकचॉम, निशी सिंग, रितुजा रिजुताई, जस्वींदर कौर व भाग्यश्री अगरवाल यांनीही सुरेख खेळ केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईने आक्रमणावर भर दिला. पिंकीने ९व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवून १-० अशी आघाडी मिळवली. त्यापाठोपाठ नवनीतने १६, २६ व ३०व्या मिनिटाला गोल केले आणि मुंबईची आघाडी आणखी मजबूत केली. निशी सिंगनेही ३१ व ३६व्या मिनिटाला गोल करत मुंबईला ६-० अशी आघाडी मिळवून दिली. ४३व्या मिनिटाला पुन्हा नवनीतने केरळची बचावफळी भेदून अप्रतिम गोल केला. या आक्रमणासमोर केरळ हतबल झाले. मध्यंतरानंतर रितुजा, जस्वींदर आणि भाग्यश्री यांनी गोल करत मुंबईच्या ११-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.
अन्य निकाल
क गट – झारखंड ६ (बिर्सी मुंडू २ मि., २२ मि. व ४३ मि., शबनम लाक्रा  २५ मि. व ५७ मि., इत्वरी मुंडू २९ मि.) विजयी वि. कर्नाटक १ (मुथम्मा पीजी १७ मि.); उत्तर प्रदेश ८ (प्रतिभा चौधरी १९ मि. व ३६ मि., रेना देवी २५ मि. व ३४ मि., श्रुती सिंग ४४ मि., कविता मयूरा ४८ मि., पूजा कुंडू ५४ मि., साधना सिंग ५९ मि.) विजयी वि. आसाम १ (मौली यादव ४२ मि.)
ड गट – पंजाब ४ (पूजा राणी २ मि., गुरजीत कौर ३८ मि., नवप्रीत कौर ५२ मि. व ५७ मि.) विजयी वि. भोपाळ २ (रश्मी सिंग ३२ मि., प्रग्या मौर्या ५८ मि.).