सहा विकेट्सने मात; गटात २६ गुणांसह अव्वल स्थान
सामन्याचा चौथा दिवस. संथ झालेली खेळपट्टी. फिरकीपटूंना मिळणारी मदत आणि विजयासाठी ७० षटकांमध्ये २९५ धावांचे लक्ष्य. तसे सारेच आव्हानात्मक. पण पहिल्या डावात आघाडी मिळवूनही मुंबईने रेल्वेचे हे आव्हान फक्त स्वीकारलेच नाही तर विजयाचा झेंडाही फडकवला. फलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर मुंबईने रेल्वेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आणि ‘ब’ गटात २६ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. श्रेयस अय्यर आणि अखिल हेरवाडकर यांनी शानदार फलंदाजी करीत विजयाचा पाया रचला. त्यावर कर्णधार आदित्य तरे आणि सिद्धेश लाड यांनी कळस चढवला. दोन्ही धावांत दमदार फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर अखिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मुंबईने २९५ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याची तमा बाळगली नाही. १९ धावांवर मुंबईने सलामीवीर गमावला. पण त्यानंतर अखिल आणि श्रेयस यांनी संयतपणे फलंदाजी करीत दुसऱ्या विकेटसाठी १८३ चेंडूंमध्ये १४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. उपाहारापर्यंत त्यांनी पाचच्या धावगतीने १२ षटकांमध्ये ६० धावा केल्या. उपाहारानंतर काही काळ स्थिरस्थावर झाल्यावर या दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. २१.३ षटकांत त्यांनी संघाला शतक पूर्ण करून दिले. अखिलला ५४ धावांवर असताना कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. काही चेंडूंवर चाचपडत खेळत असले तरी संधी मिळाल्यावर चेंडूला सीमापार करण्यात त्यांनी कसलीही कसर सोडली नाही. अखिलने १११ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७५ धावांची खेळी साकारली. अखिल बाद झाल्यावर डावखुरा फिरकीपटू सागर मिश्राने सूर्यकुमार यादवला (३) त्यानंतरच्याच षटकात बाद करीत मुंबईवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मुंबईचा संघ दोनशे धावांवर असताना चहापानाच्या चार मिनिटांपूर्वी कर्ण शर्माने श्रेयसला बाद केले. त्याने ११२ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ९१ धावा केल्या.
खेळपट्टीवर स्थिरावलेला श्रेयस बाद झाल्यावर मुंबईची स्थिती बिकट होईल, असे वाटत होते. त्यानंतरची भागीदारी जय-पराजयासाठी निर्णायक ठरणारी होती. आदित्य आणि सिद्धेश यांनी चिकाटीने फलंदाजी करीत ९५ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आदित्यने मिड विकेटला विजयी चौकार लगावत ८२ चेंडूंमध्ये सात चौकारांच्या जोरावर ७१ धावा फटकावल्या, तर सुदैवी ठरलेल्या सिद्धेशने ३ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ४१ धावा केल्या. रेल्वेचा फिरकीपटू कर्ण या वेळी दुर्दैवी ठरला. त्याच्या फिरकीचा सामना करणे मुंबईला कठीण जात होते. त्याचे वळणारे चेंडू मुंबईच्या फलंदाजासाठी त्रासदायक ठरत असले तरी त्याला हवे तसे यश मिळवता आले नाही. रेल्वेने मुंबईपुढे २९५ धावांचे आव्हान ठेवत सकारात्मक खेळी केली. सामना गमावणार अशी खात्री त्यांना होती, पण ही खेळी त्यांच्या अंगलट आली.
तत्पूर्वी, रेल्वेने दिवसाची जलदगतीने झकास सुरुवात केली. सौरभ वाकस्करने रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी साकारत १६ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर १८५ धावा केल्या. व्ही. चेलुव्हराजने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. त्याने चौथ्या दिवशी ५० चेंडूंमध्ये ६३ धावा फटकावल्या आणि एकूण नाबाद १३३ धावांची खेळी साकारत रेल्वेला चारशे धावांचा पल्ला गाठून दिला.
संक्षिप्त धावफलक
रेल्वे (पहिला डाव) : २१७
मुंबई (पहिला डाव) : ३३१
रेल्वे (दुसरा डाव) : १०४ षटकांत ४ बाद ४०८ डाव घोषित (सौरभ वाकस्कर १८५, व्ही. चेलुव्हराज नाबाद १३३; विशाल दाभोळकर ३/११५, सिद्धेश लाड १/२८).
मुंबई (दुसरा डाव) : ६४ षटकांत ४ बाद २९५ (श्रेयस अय्यर ९१, अखिल हेरवाडकर ७५, आदित्य तरे नाबाद ७१, सागर मिश्रा २/५३).
सामनावीर : अखिल हेरवाडकर.

हा विजय आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे सामन्याच्या चौथ्या दिवशी २९५ धावा करणे सोपे नव्हते. पण फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. या विजयामुळे संघाचे मनोबल कमालीचे उंचावले आहे. आम्ही गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचलो असलो तरी त्याच्याकडे आमचे लक्ष नाही. आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा आहे.
– आदित्य तरे, मुंबईचा कर्णधार