रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

तब्बल ४१ वेळा रणजी करंडकावर नाव कोरणाऱ्या मुंबईवर यंदाच्या हंगामात साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागण्याची स्थिती ओढवली आहे. त्यामुळे नागपूर येथील जामठाच्या मैदानावर रविवारपासून रंगणाऱ्या ‘अ’ गटातील साखळी सामन्यात मुंबईला गतविजेत्या विदर्भाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय अनिवार्य आहे.

सहा सामन्यांतून अवघ्या ११ गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तर विदर्भ सहा सामन्यांतून चार विजयांसह २१ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात जेमतेम पराभव टाळत पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर तीन गुण मिळवले. फलंदाजीत मुंबईची मदार प्रामुख्याने सिद्धेशसह श्रेयस अय्यर, जय बिश्ता व शिवम दुबे यांच्यावर आहे. सिद्धेशने गेल्या दोन लढतीत शतक झळकावले होते. त्याशिवाय शिवमनेदेखील आतापर्यंत दोन शतके ठोकली आहेत. गोलंदाजीत तुषार देशपांडेच्या पुनरागमनाने संघाला बळकटी आली आहे.

फैझ फझलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भला नमवणे मुंबईसाठी नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. फैझसह अनुभवी वासिम जाफर, अक्षय वाडकर यांच्यावर विदर्भाची भिस्त असून गोलंदाजीत ललित यादव, आदित्य ठाकरे आपली कामगिरी चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे या सामन्यात मुंबईला नमवून बाद फेरीसाठी आपली दावेदारी पक्की करण्याकडे विदर्भाचा कल असेल.

महाराष्ट्रासमोर गुजरातचे आव्हान

प्रतिभावान खेळाडूंचा समावेश असूनही गुणतालिकेत सातव्या स्थानी असणाऱ्या महाराष्ट्राचे यंदाच्या रणजी हंगामातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यामुळे रविवारपासून घरच्या मैदानावर सुरु होणाऱ्या ‘अ’ गटातील साखळी सामन्यात त्यांच्यापुढे गुजरातचे कडवे आव्हान असेल. कर्णधार अंकित बावणेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. केदार जाधव, समद फल्लाह यांच्यावर महाराष्ट्राची तर प्रियांक पांचाळ व पार्थिव पटेल यांच्यावर गुजरातची भिस्त आहे.

सामन्याची वेळ :

सकाळी ९.३० वा.